रोहा (प्रतिनिधी) मागील सहासात दिवस बेपत्ता असलेल्या होतकरू तरुणाचे अखेर मृतदेह कुंडलिकेच्या पात्रात आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सचिन वैजनाथ शिंदे वय ३० राहणार काजूवाडी खारी असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी ४ जुलै रोजी सकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला. दिवसभर घरी परत न आल्याने अखेर वडिलांनी दुसऱ्या दिवशी रोहा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. त्यातच नातेवाईक, ग्रामस्थ शोधाशोध घेत असतानाच सोमवारी १० जुलै रोजी सायंकाळी सचिन शिंदे याचा मृतदेह कुंडलिकेच्या पात्रात दिसून आला. दरम्यान, होतकरू लेकराच्या अचानक जाण्याने शिंदे कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला, आईवडील सबंध परिवाराने टाहो फोडला, दुसरीकडे सचिन शिंदे तरुणाच्या मृत्यूने सबंध रोहा तालुका चांगलाच हादरला आहे, तर सचिन शिंदे हा नेमका कोणत्या नैराश्यात होता, नेमका घटनाक्रम काय असे म्हणत घटनेमागे घात की अपघात ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
तरुणांच्या मृत्यूत अलिकडे भली मोठी वाढ झाली. अनेक तरुण नोकरी, आर्थिक चणचण, ऑनलाईन गेम्स यांसह विविध समस्यांत गुरफटून जात आहेत. मुझसे दोस्ती करोगे, मॅजिक, ड्रीम ईलेवन क्रिकेट गेम्समध्ये अनेकजण अडकत आलेत, त्यातून तरुणांना काहीजण घेरत मानसिक ताणतणाव देत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या. मागील वर्षभरात रोहा तालुक्यातील अनेक तरुणांनी गळफास वा अन्य माध्यमातून आपले जीवन संपविले. तरुणांना नेमके झालेय तरी काय ? याच नातेवाईकांच्या टाहोत तरुण सचिन शिंदे या तरुणाने आपले जीवन संपविले. काजूवाडी येथे राहणारा सचिन शिंदे हा सकाळी न सांगता घराबाहेर पडला. तो घरी न परतल्याने अखेर त्याच्या वडिलांनी हाकेच्या पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आणि शोधाशोध सुरू झाली. अखेर सोमवारी सायंकाळी करंजवाडी डोंगरी हद्दीतील कुंडलिकेच्या पात्रात सचिन याचा मृतदेह तरंगताना दिसून आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. तब्बल सातव्या दिवशी सचिन शिंदे याचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे एवढ्या दिवसात नेमका काय घटनाक्रम होता, सचिनसोबत नेमके काय घडले, तो नैराश्याने ग्रासला होता का, घात की अपघात ? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रोहा पोलिसांनी घटनेचा शोध घ्यावा, अशी मागणी विभागातील ग्रामस्थांनी केली. सचिन शिंदे याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट राहिल्याने अनेक सवाल उपस्थित झालेत. दरम्यान, सचिन शिंदे या तरुणाच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.