रोहा- (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील कडसुरे ग्रामपंचायती मधील महेश गोपाळ शिंदे व अन्य पाच ग्रामस्थ भ्रष्टाचारी ग्रामस्थावर फौजदारी कारवाई करत अपहार केलेली रक्कम वसुली व्हावी यासाठी १० जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासकीय निधीचा अपहार आपल्या फायद्यासाठी करणाऱ्या या सरपंचा विरूध्द ग्रामस्थांच्या या प्रामाणिक लढ्याची दखल रोहा पंचायत समिती प्रशासनाने घेत पंधरा दिवसांत याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करत अपहार झालेली रक्कम वसुल करण्याचे लेखी आश्वासन उपोषण कर्त्याना दिले.
रोहा तालुक्यातील कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र यशवंत शिंदे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात मनमानी पणे भ्रष्टाचार करत १६,३०,९८७ रुपयांचा अपहार केला होता.याविरुद्ध गावातील महेश गोपाळ शिंदे, दिलीप लिंबाजी शिंदे, पांडुरंग कृष्णा शिंदे, संदीप सटु शिंदे, दत्तात्रेय महादेव शिर्के,काशीराम पांडुरंग गवंडकर यांनी रोहा पंचायत समिती ते कोकण विभागीय आयुक्त इथपर्यंत पाठपुरावा करत सरपंचावरील सर्व आरोप सिद्ध केले. त्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी भ्रष्ट सरपंचला पदच्युत करत त्यावर कारवाई करण्याचे आदेश रोहा पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्या आदेशाची अमलबजावणी होत नसल्यामुळे अखेर वरील सर्व ग्रामस्थ १० जुलै रोजी उपोषणाला बसले होते.त्यांचे उपोषणाची दखल प्रभारी बी.डी.ओ बाळासाहेब भोगे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी महारुद्र फडतरे यांनी घेत मुख्य कार्यकारी अधिकारी रा.जि.प यांचे आदेशानुसार पुढील १५ दिवसांत भ्रष्ट सरपंचावर फौजदारी कारवाई करत अपहार झालेली रक्कम वसुल करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन मंगळवार ११ जुलै रोजी देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.रोहा पंचायत समिती प्रशासनाने आपल्या उपोषणाची दखल घेत कारवाईच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली असल्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.मात्र पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.