रोहा (राजेंद्र जाधव) रायगडातील अलिबाग, मुरुड, रोहा तालुका सामावेशक चणेरा मागास विभागात मागील अनेक वर्षापासून विविध प्रकल्प आणण्याच्या नुसत्या घोषणा आहेत. नाणारस्थित रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा घाटीही मध्यांतरी झाला. तसे पेट्रोलियममंत्री धमेंद्र यांनी अप्रत्यक्ष घोषणा केली होती. मात्र रासायनिक रिफायनरीला विरोध होण्याचे चिन्ह दिसताच रिफायनरी प्रकल्प घोषणेआधीच माघारी गेला. त्यानंतर सिडकोमार्फत तिन्ही तालुक्यांचा मुख्यत: चणेरा विभागाचा विकास साधला जाईल, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. संभावित सिडकोसाठीचे प्रयत्नही अखेर असफल ठरले. तरीही भागाचा विकास सिडको प्रकल्पामार्फतच व्हावा याच मागणीवर स्थानिक नागरिक ठाम असतानाच आता चणेरा विभागात बल्क पार्क उभारण्याचा नव्याने घाट घातला जात असल्याची माहिती समोर आल्याने चणेरा विभागात नेमका कोणता प्रकल्प उभारणार ? हे प्रशासनाने एकदाचे जाहीर करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. दुसरीकडे रायगडात यापुढे एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, रासायनिक प्रकल्पाला कडाडून विरोध करणार असे निवडणुकीच्या तोंडावर वल्गना केलेले खा सुनिल तटकरे अन्य आमदार आता काय भूमिका घेतात ? असा थेट सवाल म्हसाडी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारे व स्थानिकांनी केल्याने नेमके काय होणार ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशातच रासायनिक कारखानदारीला आमचा स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. आमच्या भागाचा विकास सिडको प्रकल्पातंर्गत करावा अशी मागणीही करण्यात आल्याने प्रकल्पांना विरोध व स्वागत करणाऱ्या नागरिकांच्या द्विधा भूमिकेत नक्की कोणतातरी प्रकल्प येतो का, कधी येतो ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
रोहा अलिबाग सिमारेषेवर असलेला चणेरा विभाग हा आजही प्रचंड मागासलेला आहे. उच्च शिक्षणाच्या सुविधा नाहीत, रोजगार नाही. त्यामुळे तरुण वर्ग रोजगारासाठी आज मुंबई, गुजरातकडे जात आहे. कारखानदारीला पुरेसे पाणी उपलब्ध नाही. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात म्हसाडी धरणाचा मुहूर्त झाला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी जलसंपदा विभागाच्या परवानग्या नसताना धरणाचे भूमिपूजन केल्याचे समोर आले. त्यानंतर सरकार बदलताच धरण स्वप्नावतच राहिले. ठेकेदाराचे भूसंपादनासाठीचे करोडो रुपये पाण्यात गेले. युवानेते उद्देश वाडकर यांचेही कार्यक्रमावरील लाखो रुपये बुडीत गेले. त्याच दरम्यान तथाकथित जलसंपदाचा घोटाळा राज्यात गाजला. याच घडामोडीत म्हसाडी धरणासाठीचे एकही दगड लागले नाही, जागेचे भूसंपादन नाही. माजी केंद्रीयमंत्री अनंद गीतेनींही निष्क्रियता कायम दाखवून दिली. अद्याप धरणाबाबत कोणतीही हालचाल नसल्याने त्यातच यावर खा सुनिल तटकरे, मंत्री अदिती तटकरे काहीच भाष्य करत नसल्याने लोकांत संताप असतानाच आता रासायनिक बल्क ड्रग्ज पार्क उभारण्याचे घाट राज्य सरकारने घातल्याचे समोर आल्याने स्थानिक विरोध करतात की स्वागत करतात ? हे पाहावे लागणार आहे. बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्पासाठी भूसंपादन जलद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १३ जुलै रोजी बैठक घेतल्याची माहिती प्रकाश विचारे यांनी दिली. मिंट या बिझनेस न्यूजच्या वृत्तानुसार इंडियन ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर्स असो. चे सचिव दारा पटेल यांना अन्न व औषधे खात्याचे सहआयुक्त डी आर गहाणे यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार रोहा, अलिबाग, मुरुड समावेश चणेरात ड्रग्स पार्क उभारण्याची माहिती समोर आली. गुजरात, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश राज्यात बल्क ड्रग्स पार्क उभारणार असल्याची माहिती केंद्रीय स्वास्थमंत्री मनसुख मांडवीया यांनी डिसेंबर २०२२ रोजी दिली. परिणामी महाराष्ट्रात चौथा बल्क ड्रग्स पार्क उभारण्याची मंजूरी केंद्र सरकारने दिली. मंजूर तीन राज्यातील एखादा पार्क रद्द करून महाराष्ट्राला विशेष मंजुरी हे तसे अजून स्पष्ट झालेले नाही, असेही विचारे यांनी टाइम्सला सांगितले आहे. रासायनिक बल्क ड्रग्स पार्क उभारण्याचा घाट घातल्याचे खात्रीशीर वृत्त चर्चेत आल्याने स्थानिक शेतकरी सत्यवान तांडेल दत्ता चौलकर, प्रकाश विचारे यांनी तातडीने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे यापूर्वीच विरोध नोंदविला आहे. आमचा विकास सिडको मार्फतच करावा, रासायनिक कारखान्याला आमचा कायम विरोध राहील असे पुन्हा एकदा म्हसाडी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी ठणकावून सांगितले. यातच खा सुनिल तटकरे यांनी रायगडात यापुढे एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशा वल्गना केल्या आहेत, तटकरे आता सत्तेत सहभागी राहून नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे संबंध सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रस्थापित चणेरा विभागात बल्क ड्रग्ज पार्क कारखाना उभारण्याचा घाट अप्रत्यक्ष समोर आल्याने प्रकल्पाला विरोध होतो की प्रकल्पाचे स्वागत होते ? हे पाहावे लागणार आहे, त्यात चणेराला अप्रत्यक्ष मागास ठेवणाऱ्या तटकरे विरुद्ध पाटील राजकारणातील संघर्षात नेमका आता कोणता प्रकल्प येतो, कधी येतो ? याची उत्कंठा पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे.