रोहा (शशिकांत मोरे) रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची तोडफोड, रस्त्यावर अडचणी ठरलेली झाडे झुडपे, नालेसफाई, भंगार चोरांचा सुळसुळाट, पथदिवे बंद अवस्थेत, पार्किंग झोन तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या अशा विविध समस्यांमुळे अक्षरशः विविध समस्येंच्या गर्तेत सापडली आहे. तर संबंधित अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेही पहावयास मिळत आहे.
गेली ४५ वर्षापासून असलेल्या या औद्योगिक वसाहतीला असंख्य समस्यांनी अक्षरशः पोखरले आहे. संबधित अधिकारी वर्ग मात्र या समस्येकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्ये विषयी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर सदर विषयाचा खुलासा करण्यास नजीकच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात ग्रामविकास अधिकारी दिपक चिपळूणकर यांच्यासह ग्रामस्थानी संबंधित अधिकारी वर्गाची भेट घेतली. दरम्यानच्या भेटीत पिण्याच्या पाण्याबाबत व इतर समस्यांचा ग्रामस्थानी अक्षरशः पाढाच वाचला.यामधे नालेसफाईची कामे व्यवस्थित न झाल्याचा ठपका ठेवत थातुर मातुर नालेसफाईच्या कामांमुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने पाणी साचून कधी नाही ते यावर्षी गावात सगळीकडे पाणीच पाणी होऊन भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दाखवून दिले. वसाहती अंतर्गत रस्त्याचे मागील वर्षी डांबरीकरण झाले आणि लगेच खड्डे पडायला सुरुवात झाली तर कसलीही परवानगी न घेता रस्त्यांची झालेली तोडफोड आणि त्या पाणी साचलेल्या खड्यांची अवस्था तर रस्त्यावर रहदारीला अडचण ठरलेली झाडे झुडपे यासह बंद अवस्थेत असलेले पथदिवे, रहदारीच्या रस्त्यात अडचण निर्माण करणारी उभी वाहने या सर्व समस्या थेट जागेवर जाऊन पाहणी केली. आणि दाखवून दिले आणि समस्येबाबत जाब विचारला.
या पाहणी दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता शशिकांत गीते यांच्यासमवेत कनिष्ठ अभियंता विनीत कांदळकर यासंह इतर अधिकारी वर्ग तर ग्रामस्थांमध्ये उपसरपंच अशोक मोरे, सूर्यकांत मोरे, ग्रामस्थ अध्यक्ष बाळकृष्ण रटाटे, सदस्य सोनू जाधव, किशोर रटाटे रुपेश रटाटे, आदेश भोकटे, राजू भोकटे, अनंता म्हसकर, मंगेश भोकटे, प्रवीण भोकटे यांसह ग्रामस्थ तरुण वर्ग उपस्थित होते. दरम्यान झालेल्या पाहणी नंतर तरी संबंधित प्रशासन जागे होऊन प्रलंबित समस्यांकडे जाणीव पूर्वक पहाणार का असा प्रश्न समोर येत असून संबंधित अधिकारी काय ठोस भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे,रस्त्यांची तोडफोड,रस्त्यावर अडचणी ठरलेली झाडे झुडपे,भंगार चोरांचा सुळसुळाट,पथदिवे बंद अवस्थेत,पार्किंग झोन तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहेतच मात्र यावर्षी नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने गावात पाणी शिरून भातशेतीच्या प्रचंड नुकसानाला सामोरं जावे लागणार आहे.
सूर्यकांत मोरे
ग्रामस्थ (धाटाव)
नालेसफाई,रस्त्यांची तोडफोड,बंद पथदिवे यासह इतर काही गोष्टींची पाहणी केली.दरम्यान समोर आलेल्या समस्यांचे निवारण लवकरात लवकर होतील.काही समस्यांचा इम्पॅक्ट लगेचच दिसून येईल.
शशिकांत गीते
उप अभियंता (उप विभाग रोहा)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.