रोहा (राजेंद्र जाधव) अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करत विनयभंग केल्याप्रकरणी संबधीत आरोपीला तब्बल ३ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. माणगाव सत्र न्यायालयाने सोमवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुखदरवाडी हद्दीतील अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना २०१९ रोजी घडली. सदर अल्पवयीन मुलीला भांडुप येथील नातेवाईकांकडे नेवून आरोपीने तिचा विनयभंग केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी अखेर आरोपी महेश किशोर जाधव याला सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुखदरवाडी गावातील ही भयानक घटना आहे. संबधीत आरोपी महेश जाधव याच्याविरोधात भादवी कलम ३६३, ३५४ (अ) सह पोक्सो ७,८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक आर एस जाधव यांनी केला. आरोपीवर दोषारोप पत्र मा जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल झाले. खटल्याची सुनावणी मा विशेष न्यायालय माणगाव येथे झाली. गुन्ह्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. खटल्यामध्ये अति शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहीले. कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सुनावणी दरम्यान अधिकारी अनंत पवार, पोलीस उपनिरीक्षक छाया कोपनर, पोलीस हवालदार शशिकांत कासार, शशिकांत गोलिपकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. मा विशेष व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्हाच्या शाबीतीनंतर आरोपी किशोर जाधव यांस दोषी ठरवून सोमवार ७ ऑगस्ट रोजी आरोपी महेश जाधव याला अल्पवयीन मुलीला अपहरण करून विनयभंग प्रकरणी ३ वर्षाची सक्तमजूरी, १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. माणगाव सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिल्याने अल्पवयीन मुलीच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त झाली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीचे अपहरण करत विनयभंग प्रकरणी आरोपीला सक्तमजूरीची शिक्षा झाल्याने सृजन समाजाने समाधान व्यक्त केले आहे.