रोहा (राजेंद्र जाधव) कोकण रेल्वेच्या रोहा रेल्वे स्थानकातून अष्टमी, रोठ खुर्द, वरसे, भुवनेश्वर तळाघरमार्गे वाली विरझोली ते दिघी आगारदांडा जेटीसाठी अदानीची मालगाडी लवकरच धावणार असल्याचे आता अधिक स्पष्ट होत आहे. देशात मोदी राज असल्याने अदानीची मालगाडी निश्चितपणे धावणार, अशी शक्यता मूर्तस्वरूप घेत आहे. रोहा ते दिघी आगरदांडा शेतजमीन संपादनबाबतची अधिसूचीही प्रसिद्ध झाली. मात्र मागील काही वर्षापासून वरसे, तळाघरमार्गे रेल्वे बोगद्यातून आगारदांडा पर्यंत जाणार, अशी फक्त ओरड होती. मात्र मालगाडी रेल्वे मार्गिका नेमके कुठून, कसे असेल याची कोठूनही शाश्वती मिळाली नाही, ही घडामोड चालू असतानाच मालगाडी रेल्वेचा ट्रॅक आता अधिकृत रेखाटण्यात आला आहे. तरीही शेतजमिनीच्या सर्व्हेमध्ये कोणत्याच हरकती विचारात घेण्यात आल्या नाहीत. रोठ वरसेतून ही रेल्वे मालगाडी आर क्षेत्र आरक्षीत जागा घेत बहुचर्चित शिल्प नगरीला वळसा घालत निवी गावाच्या मागून तळाघरकडे निघत आहे, तळाघर डोंगराच्या बोगद्यातून वाली, भालगावमार्गे दिघी पोर्टकडे प्रयाण करण्याचे स्पष्ट सूतोवाच आले, किंबहुना ही मालगाडी वरसे गावाच्या मागून एमआयडीसीला लागून असलेल्या पडीत शेतजमिनीतून तळाघर बोगद्याकडे गेल्यास आर झोन आरक्षीत जागा वाचविता आली असती, अडथळा ठरणारे बंगले, इमारती वाचविता येतील, निवी पुढील सर्वच गावांचा नकाशा बदलला नसता, असे मत समोर आले. मालगाडी रेल्वेचा ट्रॅक, त्यासाठी शेतजमीन जागेचे संपादन सर्वच पातळीवर शेतकरी अद्याप अनभिज्ञ असल्याचेच अधोरेखीत झाल्याने बाधीत शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळणार ? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, आपल्या किंमती जागेतून अदानीची मालगाडी धावणार आहे, किती मिळतील, अजून काय हवे, असे बोटं मोजत अनेकजण मालामालसाठी सज्ज झालेत, अशात निवी, तळाघर, वाली, भालगाव उचेल यांसह सर्वच गावांच्या रेल्वे बाधीत शेतकऱ्यांना नेमका काय मोबदला मिळतो ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रोहा ते दिघी आगारदांडा औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिक विकसित होत असलेल्या पोर्टसाठी अदानी कंपनीची मालगाडी धावणार आहे. मूळात दिघी पोर्ट अदानी कंपनीचीच आहे. आता प्रस्तावीत मालगाडी रेल्वे अष्टमी, रोठ, वरसे, निवी, तळाघरमार्गे वाली, भालगाव, विरझोली, उचेल दिघी पोर्टकडे धावण्याचे स्पष्ट संकेत मिळाले. याआधी रेल्वे जाणार आहे, त्यासाठी अनेक चुकीचे मॅप, जागा नकाशे संपादन दाखवीत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण करण्यात आला. अखेर याच ट्रॅकवरून मालगाडी रेल्वे जाणार असल्याचे अधिक स्पष्ट झाले, ही मालगाडी वरसे गावाच्या मागून एमआयडीसीला लावून असलेल्या पडीक शेतजमिनीतून जायला हवी होती, कंपन्यांच्या मालासाठीही महत्त्वाचा थांबा ठरला असता. मात्र मालगाडीचा मार्ग वरसेच्या मागून भुवनेश्वर, तळाघरमार्गे दिघीकडे जात असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने, तशी अधिसूची निघाल्याने प्रथम वरसे, भुनेश्वरमधील बडे जमीन मालक जागे झाले. आर झोन क्षेत्र असल्याने रग्गड पैसा मिळणार, याच संभ्रमात अनेक बडे आहेत, तरीही रेल्वे आरक्षीत जागा सोडून उर्वरीत क्षेत्राचे काय, निवी, तळावर, वाली, विरझोली, उचेल सर्वच हद्दीतील बाधीत जमिनींना न्याय्य मोबदला मिळणार का, भुवनेश्वर सर्व्हीस रोडचे काय, भूमीहीन शेतकऱ्यांचे काय होणार, प्रकल्पग्रस्तबाबत स्पष्टता काय ? याबाबत अद्यापतरी प्रशासनाकडून काहीच स्पष्टता नाही. याउलट जमिनींबाबत अधिसूची महसूल विभागातून जाहीर झाल्याने सर्वच शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. काही जमीन मालक योग्य मोबदला व इतर बाबींसाठी लढा देण्यासाठी सज्ज झालेत. विभागीय नेते मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे संघटनाही सज्ज झाल्याचे समजते. तरीही सामान्य शेतकऱ्यांना एकत्र करत, जे प्रत्यक्ष रेल्वेच्या जमिनीसाठी बाधीत आहेत, त्यांना राजकारण विरहित एक करून योग्य मोबदला देण्यासाठी दुसरा ग्रुप लवकरच कार्यरत होत आहे. कायद्याची लढाई लढण्याची क्षमता असलेल्या संबधीत लोकांकडे आता बहुसंख्य शेतकरी आकर्षित झाल्याने पुढे काय होते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, मालगाडी रेल्वे संपादीत जमीन मालकांना योग्य मोबदला मिळावा, रेल्वे आरक्षीत जागा सोडून बाधीत जमिनीलाही योग्य भाव मिळावा, असे प्राथमिक बोलले जात आहे. दुसरीकडे सर्वच पातळीवर राजकारण आल्यास शेतकऱ्यांची नुकसान होण्याची भीती व्यक्त झाली तर आपल्या शेत जमिनीतून रेल्वे जाणार असल्याने आम्हाला नेमके काय मिळणार ? अशा संभ्रमात मुख्यत: निवी, तळाघर, विरझोली, भालगाव सर्वच बाधीत शेतकरी असल्याचे गुरुवारी समोर आले. त्या सर्व शेतकऱ्यांना कितपत न्याय मिळतो ? हे लवकरच समोर येणार आहे. अशात वरिष्ठ महसूल विभागाने शेतकऱ्यांत जनजागृती करावी, अशी मागणी झाली आहे.