रोहा -(महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील बहुचर्चित, वादातीत राहिलेल्या २६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या मालिकेचे काम अखेर सुरु झाल्याचे धामणसई विभागात होत असलेल्या कामावरून दिसत आहे. मात्र हे काम सुरु करताना एक दोन वर्षापुर्वीच नव्याने निर्माण केलेल्या प्रजिमा ९६ अष्टमी धामणसई व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या मालसई रस्त्याची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवार १२ ऑगस्ट पासून या ठिकाणी जेसीबी मशिनने रस्त्याच्या साईडपट्टी वर उत्खनन होत त्यात पाईप टाकण्याचे काम सुरु झाल्याचे पाहुन याबाबत अनभिज्ञ असलेल्या स्थानिकांत कसले काम सुरु असल्याची चर्चा सुरु झाली. अखेर २६ गाव योजनेचे काम तेही आमच्या भागातील रस्त्या बाजूला होत असताना त्यामुळे होणारे चांगल्या रस्त्याची दुरावस्था यामुळे स्थानिकांत याला विरोध होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्रामसडक, जिल्हा परिषद बांधकाम या विभागांकडे चौकशी केली असता याबाबत आमच्या कडे कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. यावरून हे सर्व काम कोणत्याही संबंधित विभागांच्या परवानग्या न घेता सुरु आहे. या आधीची योजना ही मुळ लाभार्थी गावांपर्यंत न पोहोचता त्यातील पाण्याची मध्येच मोठ्याप्रमाणात चोरी झाल्यामुळे फेल गेल्याच महत्वाच कारण आहे. आता या भागातून काम होत असताना पुन्हा तेच प्रकार भागात झाले तर याला दोषी कोण असलेल किंवा असे काही ठरवूनच ही योजना या भागातून जात नाहीना अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
धाटाव औद्योगिक वसाहती मधील रासायनिक पाण्यामुळे कुंडलिका पश्विम खोऱ्यातील २६ गावांचे पाणवठे हे दूषित झाले आहेत. त्यामुळे आम्हाला एमआयडीसी स्वतंत्र व स्वच्छ पाणी द्यावे ही मागणी या भागातील नागरिकांकडून सातत्याने होत होती. अखेर २०११ साली या गावांसाठी २६ गाव पाणीपुरवठा योजना मंजूर होत त्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे हस्ते भूमिपूजन होत कामाला सुरुवात झाली निधी एमआयडीसी चा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम करणार व त्यानंतर ही योजना रायगड जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत होणार असा प्रारूप आराखडा होता. मात्र सर्वच आलबेल असल्यामुळे ही योजना अनेक कारणामुळे नेहमीच चर्चेत रहात नागरिक मात्र पाण्यापासून वंचितच राहिले. यामध्ये धाटाव पासून ही योजना जात असताना मध्ये लागलेल्या काही ग्रामपंचायती व धनदांडग्यांनी पाण्यावर डल्ला मारल्यामुळे योजनेचे मुळ उद्दिष्ट साध्य झाले नाही.यासाठी सर्वच राजकीय पक्षात श्रेयवादाची स्पर्धा लागलेली पहायला मिळाली.
अखेर नव्याने ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून यासाठी ३३ कोटि खर्च होणार आहेत. याच काम आता उडदवणे मुठवली, रोहा नगरपरिषदडंपींग ग्राउंड, रेल्वे स्थानक येथून पुढे शेणवई पर्यंत सुरु झाले आहे. मात्र हे होत असताना प्रधानम ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अखत्यारीतील रस्त्यांच्या बाजूला खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. आधीच हे रस्ते अरुंद त्यामध्ये लागूनच साईडपट्टी खोदून काम होत असल्यामुळे ते स्थानिकांसाठी धोकादायक ठरणार आहे. यासोबतच रस्त्यावर खोदलेली माती, पाईपची चढ उतार यामुळे मुख्य रस्ता ही निकामी होत आहे. यासंबंधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे पेण उपविभागीय अभियंता कोठेकर यांचेशी संपर्क साधला असत कार्यकारी अभियंता रायगड जिल्हा परिषद यांचे कडे याकामी परवानगी अर्ज केला असल्याचे सांगितले आहे. मात्र ज्यांचे अखत्यारीत हे रस्ते आहेत त्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग रोहा, मुख्यमंत्री ग्रामसडक शाखा अभियंता,रोहा नगरपरिषद यांचे कडे आजवर कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.