उरण ( विठ्ठल ममताबादे ) कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पागोटे ता.उरण जि. रायगड या ठिकाणी सात दिवसाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या थीमवर आधारित या शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ. सुशील शिंदे यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बळीराम एन. गायकवाड, गावचे सरपंच कुणाल पाटील, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश नारायण भोईर, उपसरपंच सतीश ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध शिबिरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले. त्यामध्ये ग्रामस्वच्छता,आरोग्य विषयक जनजागृती व लोकसंख्या नियंत्रण जनजागृती याविषयी विशेष भर देण्यात आला. सकाळी ६:३० ते रात्री १०:०० अशी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांची दिनचर्या होती. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिस्त, आरोग्याच्या संदर्भात जागृती, नेतृत्व विकास कौशल्य, संवाद कौशल्य, संघटन कौशल्य इत्यादी विविध गुणांचा विकास करण्याच्या अनुषंगाने हे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर अत्यंत मोलाचे ठरले. शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमात कु. पूजा पाटील, कु.वैष्णवी पाटील व शैलेश खंदारे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून खूप शिकायला मिळाले अशा भावना व्यक्त केल्या. योगा, श्रमदान व दुपारच्या बौद्धिक सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार रुजवण्याचे कार्य या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्ता हिंगमिरे, सह कार्यक्रमाधिकारी अनुपमा कांबळे, विनिता तांडेल, पूजा गुप्ता व सदाभाऊ लेंडी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
एन.एस.एस श्रमसंस्कार शिबिर संपन्न
207 Views