म्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्याती ग्रामीण भागात कोरोना आपले हातपाय विस्तारू लागला आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रुप ग्रामपंचायत पाभरा येथे कोरोनाचा रुग्ण भेटल्याने आरोग्य सेवेपुढे असलेले आवाहन अधिक गडद झाले आहे. १८ मे रोजी वडाला येथून पाभरा येथे आलेल्या एक ४८ वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पाभरासहित संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात या आधी दुर्गवाडी येथील एका रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पाभरे येथील हा नवीन रुग्ण सापडल्याने तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या आता २ झाली आहे.
ग्रामीण भागातील अनेक गाव व वस्तीतून आजही लॉकडाउनच्या घोषणेला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे या ग्रामीण भागात देखील कोरोना आपले हातपाय पसरू लागला आहे. तालुक्यात शहरी भागाच्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या जास्त प्रमाणात असून तेथे नियमांचे पालन देखील केले जात नाही. यामुळे येणार्या काळात तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाभरा येथील संबधित रुग्णासोबत आलेल्या त्याचा कुटुंबं व नातवाईकांसाहित प्रवास केल्याने आरोग्य सेवेपुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे. दरम्यान, या सर्वांना होमक्वारंटईन केले असले तरी, त्या सर्वांची चाचणी होणे देखील आवश्यक आहे.