धावीर रोड (अंजूम शेटे) रोहा अष्टमी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या सूचनेनुसार स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती मयूर दिवेकर, मुख्याधिकारी दयानंद गोरे, कार्य निरीक्षक श्रीनिवास पाटील, पाणी विभागाचे ओंकार भुरण यांनी शुक्रवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेला सदिच्छा भेट दिली. त्या सदिच्छा भेटीत खेड नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीमध्ये सुक्या कचऱ्याची प्रदूषणमुक्त विल्हेवाट लावण्यासाठी गॅसिफायर कंपनीने विकसित केलेल्या प्रकल्पाची पाहणी केली.
खेड नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीमध्ये सुक्या कचऱ्याची प्रदूषणमुक्त विल्हेवाट लावण्यासाठी उभारलेला
प्रकल्प त्या पद्धतीने रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीत प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्याबाबत प्रयत्न करत असून हा प्रकल्प सुरु झाला तर रोहा अष्टमी शहरातील सुक्या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प रोहा अष्टमी नगरपरिषदेचे डम्पिंग ग्राउंड येथें सुरु करण्याबाबत लवकरच खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्याशी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत प्रकल्पाविषयी चर्चा करुन प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती महेंद्र दिवेकर यांनी दिली.
यावेळी गॅसिफायर कंपनीचे अशोक मुळीक, खेड नगरपरिषदेचे गटनेते भूषण चिखले, आरोग्य सभापती प्रशांत कदम, बांधकाम सभापती सौ सुरभी धामणस्कर, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, वसुली अधिकारी परशुराम पात्रे, बांधकाम विभागाचे नागेश बोण्डले, छाया अहिरे, दिलीप पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.