प्रयोगशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर सन्मान, रायगड प्रेस क्लबचा उपक्रम, कारीवणे येथील वंदना वारगुडे, खांबेरे येथील गणेश भगत यांचा सन्मान

Share Now

469 Views

रोहा (प्रतिनिधी) शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. प्रचंड काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रती प्रत्येक घटकाने आदरभाव जपला पाहिजे. आता तरुणही नोकरी व व्यवसायाला पूरक मानत शेतीकडे वळला पाहिजेत, त्यासाठी विविध सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. दऱ्याखोऱ्यातील शेतीत मिळणारा आनंद, शेतकऱ्यांकडून मिळणारा मायेचा ओलावा खूपच भावनिक वाटतो याच उदारदायित्वातून प्रयोगशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करणाचा विचार पूढे आला. त्याच विचारांतून रोहा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी वंदना वारगुडे, गणेश भगत यांचा रायगड प्रेस क्लबच्या वतीने शेताच्या बांधावर आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान केला असे भावनिक उद्दगार मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी काढले. रोहा प्रेस क्लबच्या सहयोगी माध्यमातून गुरुवारी वाशी ग्रामपंचायत हद्दीतील कारीवणे येथील शेतकरी वंदना वारगुडे, चणेरा खांबेरे येथील गणेश भगत यांचा आदर्श शेतकरी पुरस्कार २०२३ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी अष्टीवकर बोलत होते.

रायगड प्रेस क्लबचा आदर्श शेतकरी पुरस्कार रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून देण्यात आला. वाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना वारगुडे यांना कारीवणे येथे जाऊन शेताच्या बांधावर हा पुरस्कार दिला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रोहा सिटीझन फोरमचे आप्पा देशमुख, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, युवा नेतृत्व सतीश भगत, जनार्दन ढेबे, प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, पत्रकार, ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते तर खांबेरे येथील प्रगत शेतकरी, विविध पुरस्कारप्राप्त गणेश भगत यांच्या शेताच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, आप्पा देशमुख यांसह शेतकरी प्रतिष्ठानचे दगडू बामुगडे, खेळू थिटे, रघुनाथ कडू, प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड प्रेस क्लबचा आदर्श शेतकरी पुरस्कार सरपंच वंदना वारगुडे यांना मिळाल्याने या प्रातिनिधिक गावाचा सन्मान आहे. यातून शेतकऱ्यांना ऊर्जा मिळेल अशी भावना माजी सरपंच सतीश भगत यांनी व्यक्त केली. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे घोषवाक्य बदलून नोकरी व्यवसाय सांभाळून पर्यायी शेती करण्याची गरज आहे पूरक शेतीकडे वळले पाहिजे, अशी मिमांसा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले तर महिला भगीनी शेतकरी सर्वकश भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवतात. कृतीशील शेती करतात याचे मोठे समाधान आहे असे विचार मिलिंद अष्टीवकर यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील कृतीशील आदर्श शेतकरी गणेश भगत यांनाही रायगड प्रेस क्लबचा आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा शेतकरी सन्मान पुरस्कार आम्हा सर्व शेतकऱ्यांचे कौतुक आहे, शेतीकडे तरुणांनी वळावे, पूरक शेती व्यवसाय करावा यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून काम करीत आहोत, पत्रकारांच्या शेतकरी सन्मान पुरस्काराने आमचा उत्साह अधिक वृंध्दीगत झाला आहे, अशी भावना गणेश भगत यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी फळफळाव, मस्यशेती अन्य प्रकारच्या शेतीत अधिक प्रयोग होण्याची गरज व्यक्त केली, आम्ही पत्रकार नेहमीच कृतीशील शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असा विश्वास अष्टीवकर यांनी व्यक्त केला. शेतकरी गणेश भगत यांनी उपस्थित सर्व पत्रकार, शेतकरी, ग्रामस्थ यांना शेताच्या बांधावर चविष्ट, रुचकर भोजन दिले, म्हणजेच शेताच्या बांधावर मोटला दिला. उपस्थित पत्रकारांनी मस्यशेती, कुक्कुटपालन यांची माहिती घेऊन पर्यटन केले. दरम्यान, रायगड प्रेस क्लबच्या आदर्श शेतकरी पुरस्कार, शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान उपक्रमाचा जिल्हा तालुक्यात मोठे कौतुक झाले आहे. रोहा प्रेस क्लबचा शेतकरी सन्मान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी अध्यक्ष शशिकांत मोरे, कार्याध्यक्ष नाना खरीवले, सरचिटणीस रवींद्र कान्हेकर, नरेश कुशवाह, संदीप सरफळे, समिधा अष्टीवकर, शाम लोखंडे, जितेंद्र जाधव, शरद जाधव, केशव म्हस्के, उद्धव आव्हाड, अंजुम शेटे, निलम सावंत व पत्रकार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *