रोहा (राजेंद्र जाधव) प्रख्यात शिल्पनगरी अंतर्भूत डोंगर जमीन संबंधीत मालकाने विक्रीच्या प्लॉटींगसाठी अख्खा डोंगरच पोखरून भलतीच आफत उभी केली. चक्क उंच डोंगरावर क्रेन, जेसीपीच्या साहाय्याने प्लॉट तयार केले, रस्ते केले. त्यासाठी डोंगराची माती खालीवर करण्यात आली. त्यातून आलेली माती, दगडगोटे खाली आले, आता पावसाळ्यात हीच माती सर्वत्र पसरू लागली. माती कालव्यात जावू लागल्याने पुरस्थितीचा धोका निर्माण झाला. आधीच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष, त्यात अनेक शेतकऱ्यांनी पोट कालव्याच्या मोऱ्या बंद केल्याने काळभैरव मंदिरासमोरील रस्त्यावर पाणी वाढू लागले. वरसेतील काही वस्तीला, शेतीला मोठा फटका बसला. याला डोंगर पोखरणारा मालकही तितकाच जबाबदार आहे, हे सलाम रायगडने समोर आणताच उशिरा का होईना शुक्रवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोखरलेल्या डोंगर प्रकरणाची अखेर दखल घेतली. मूळात पोखरलेल्या डोंगराने रस्ता, वस्तीला धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत प्रांताधिकारी, तहसील प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी असे पत्रही ग्रामपंचायतीने प्रशासनाला दिले होते. मात्र महसूल प्रशासनाने खाते धोरणातून वेळीच लक्ष दिले नाही, याउलट अनेकांनी मदतीचा हात घेतला. आता उशिरा वराती मागून घोडे का होईना महसूल यांसह संबंधित प्रशासन डोंगर पोखरल्याप्रकरणी संबधीत मालकांवर काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वरसे ग्रामपंचायत हद्दीत नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक जमीन मालक आपल्या जमिनी नाहरकत व नागरीकरणासाठी वापरात आणत आहेत. यातील शिल्प नगरीतील डोंगराचे मालक यांसह काही भागधारक यांनी मालकी हक्क जागा सपाटीकरण व प्लॉटींग करण्याच्या कामात उभ्या डोंगरालाच धक्का पोहचवला. डोंगराची माती सैल झाल्याने दगडगोठे आधीच खाली आले, तर आता मुसळधार पावसात डोंगराची माती मोठ्या प्रमाणात कालव्यात येऊ लागली. आधीच कालव्याचे पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे वरसेतील अनेक वस्तीला, शेतीला पाण्याचा धोका निर्माण झाला. जणूकाही भुस्खलन होते की काय ? अशी भीती निर्माण झाली. दुसरीकडे याच डोंगरांची माती ग्रामपंचायतीच्या डंपिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर वांरवार येत आहे, त्यामुळे नेहमीच घंटागाडी बंद राहत असल्याने वस्तीतील कचऱ्याचा प्रश्नही नेहमीच अधिक गंभीर झाला. दरडी कोसळणाऱ्या घटनेनंतर डोंगर पलिकडे असणाऱ्या निवी गावातील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. डोंगर सैल झाल्याने अधिक नुकसान होणार नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली. याच तक्रारीची वराती मागून घोडे वाक्याप्रमाणे महसूल विभागाने दखल घेतली. शुक्रवारी घटनास्थळाची मंडळ अधिकारी भरत सावंत, तलाठी सचिन काटे यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच नरेश पाटील, रामा म्हात्रे व ग्रामस्थ उपस्थित होते. घटनेसंबंधी प्रत्यक्षदर्शी अहवाल प्रांत, तहसील प्रशासनाला सादर केला जाईल, संबधिंतांवर कारवाई करायच्या दृष्टिने वरिष्ठ प्रशासन निर्णय घेईल, डोंगराची माती खाली सरकत आहे, मानवी वस्तीला धोका संभवू शकतो अशी प्रतिक्रीया काटे यांनी दिली. दरम्यान, डोंगराची मालकी असणाऱ्या संबंधितांनी डोंगर पोखरून कालवा व वस्तीला धोका निर्माण केल्याने याबाबत प्रशासन नेमकी काय दखल घेतो, संबंधितावर काय कारवाई केली जाते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तर डोंगर पोखरून धोका निर्माण करण्याच्या सर्व प्रकाराला कारणीभूत कोण ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.