रोहा (राजेंद्र जाधव) भुवनेश्वर हद्दीतील शिल्पनगरीजवळ असलेल्या बंद घरात बुधवारी रात्रौ मोठी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली. घराच्या आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा उठवून चोट्यांनी चांगलाच डल्ला मारला. चोरीत दागिने, रोकड यांसह अन्य मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे प्राथमिक सांगण्यात आले. चोरीची घटना समजताच श्वान पथक, फिंगर पथक यंत्रणा शोधार्थ तातडीने दाखल झाली. पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, उपचारार्थ मुंबईला गेलो होतो, त्याचाच फायदा चोरट्यांनी उचलला, तरीही आम्ही घरात असतो तर कदाचित अनर्थ घडला असता, सुदैवाने आम्ही नव्हतो, अशी प्रतिक्रिया मोहन साठे यांनी दिली, तर रस्त्याला वीज नाही, सुरक्षित वाटावे असे नियोजन नाही, त्याचाच हा फटका आहे, ग्रामपंचायतीने आतातरी सुविधा कराव्यात अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
रोहा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, तटकरे यांचे निकटवर्तीय मोहन साठे यांनी काही वर्षांपूर्वी शिल्पनगरी समोरील जागेत छोटेखानी बंगला बांधला. त्या बंगल्याच्या आजुबाजूला फारशी वस्ती नाही, त्यामुळे साठे यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, कंपाउंड सुरक्षीत करून घेतले. मालक मोहन साठे हे कामानिमित्त काही दिवस बाहेर गावी असल्याचा फायदा चोरटयांनी घेतला. तरीही मोहन साठे यांनी एका व्यक्तीवर घराची जबाबदारी दिली, ते धाटाव एमआयडीसीतील कंपनीत बुधवारी रात्रौ कामावर गेल्याचे समजताच चोरीचा हा गंभीर प्रकार घडला असे पोलिसांनी प्राथमिक सांगितले. दरवाजा शेजारील ग्रील उपटून काढून खिरकीद्वारे चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले. चोरट्यांनी आधी समोरील सीसीटीव्ही कॅमेरा वर केला, दुसरे अतिशय शिताफीने मोडतोड करून टाकले आणि खिडकीतून घरात आत प्रवेश केला, हे घटनाक्रमातून दिसत आहे. आत घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाट, बेड सर्वच विस्कटून दागिने, रोकड लंपास केल्याचे दिसत आहे. पोलीस निरिक्षक प्रमोद बाबर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आठदहा तोळे सोने, काही रोकड चोरीला गेल्याचे मोहन साठे यांनी प्राथमिक सांगितल्याचे पत्रकारांना सांगितले. अधिक तपास, पंचनामा सुरू आहे, आम्ही तपासाचा सर्वबाजुने वेग वाढविला आहे. चोरट्यांना पकडण्याच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित केली आहे,अशी अधिक माहिती बाबर यांनी दिली. दरम्यान, घरात कोणी नाही, घराच्या आजूबाजूला वस्ती नाही, घर सांभाळणारा व्यक्ती कामावर गेला, याचाच फायदा चोरट्यांनी उचलला असेच दिसत आहे तर अतिशय शिताफीने चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आता रोहा पोलिसांवर आहे. पोलीस यंत्रणा चोरट्यांचे धागेदोरे शोधून कितपत यशस्वी होते ? हे पहावे लागणार आहे, तर भुवनेश्वर हद्दीत चोरीची मोठे घटना घडल्याने भुवनेश्वर, निवी गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.