रोहा -(महेंद्र मोरे) रोहा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी अशी घटना मंगळवार दि.25 जुलै रोजी घडली आहे. आम्ही शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या बसवण्यासाठी आलो असल्याचे सांगत भिसे येथील एका घरात पाच इसम शिरले होते. याच वेळी त्यांची नात बाहेरून आली असता आपल्या घराला आतून कडी असल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरडा केला असता ते इसम पळून गेले. यामुळे चोरी अथवा अन्य मोठा अनर्थ होण्याची घटना टळली आहे. या घटनेची माहिती रोहा पोलिसांत पोलीस पाटील संतोष जाधव यांनी तात्काळ दिली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. किशोर देशमुख व पोलिस निरिक्षक प्रमोद बाबर यांनी केले आहे. या घटनेवरुन मेढा, निडी फाटा, आमडोशी फाटा या भागात सी सी टी व्ही यंत्रणा ही अत्यंत गरजेची असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. रिलायन्स, सुप्रीम या कंपन्यांनी सामाजिकदायित्व निधी सार्वजनिक सुरक्षितता यासाठी खर्च करावा असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की रोहा तालुक्यातील भिसे येथे मंगळवार दि. 25 जुलै रोजी विलास कालेकर व त्यांच्या पत्नी आपल्या व्यवसायानिमित्त आठवडे बाजारासाठी बाहेरगावी गेले असता संद्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्या घरी ५ अनोळखी इसम आले. त्यावेळी घरामध्ये त्यांचे वयोवृद्ध आईवडील हे दोघेच घरामध्ये होते. त्या आलेल्या इसमांनी आपण शासन आपल्या दारी अंतर्गत आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या बसवायला आलो असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवत त्या वृद्ध दांपत्याने त्यांना घरात घेतले. जसे हे सर्व घराच्या आतील भागात आले याचा फायदा घेत त्या इसमांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. याच वेळी कालेकर यांची मुलगी घराकडे आली असता आपल्या घराला आतून कडी लावली असल्याचे लक्षात आले. आजी आजोबांना आवाज देउनही दरवाजा उघडला जात नसल्यामुळे तिने आरडाओरडा करत दरवाज्यावर लाथा मारण्यास सुरुवात केली. यावेळी त्या इसमानी दरवाजा उघडून ते पळून जाण्यात यशस्वी झाले. ही वार्ता गावचे पोलिस पाटील संतोष जाधव यांना समजताच त्यांनी रोहा पोलिसांत या घटनेची माहिती दिली. सुदैवाने या घटनेत चोरी अथवा अन्य कोणतीही घटना घडली नसली तरी नागरिकांनी आपल्या गावात वा घराच्या परिसरात असे कोणीही अनोळखी इसम आढळल्यास सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
रोहेकरांनो सावधान,’शासन आपल्या दारी’ सांगत चोरटे शिरले घरात, भिसे गावातील घटना, बालिकेच्या सतर्कतेने अनर्थ टळला,
1,756 Views