रोहा (प्रतिनिधी) महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती लोकांना व्हावी आणि त्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा तसेच लोकांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी महसूल प्रशासन दिनांक ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबवत आहे. त्या अनुषंगाने रोहा तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने ०१ ऑगस्ट या महसूल दिनी ‘महसूल सप्ताहाचा शुभारंभ’ कार्यक्रम तहसील कार्यालय येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड हे होते. या कार्यक्रमास तहसीलदार डॉ किशोर देशमुख ,अपर तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री माळवे, परिविक्षाधीन तहसीलदार प्रज्ञा काकडे, निवासी नायब तहसीलदार राजेश थोरे, नायब तहसीलदार वैशाली काकडे, नायब तहसीलदार उज्वला अंधेरे तसेच सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी उपस्थित होते. महसूल सप्ताहादरम्यान सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून शासकीय योजनांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी केले. तहसीलदार डॉ किशोर देशमुख यांनी महसूल सप्ताह दरम्यान सातही दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार असून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना लाभ पोहोचवण्यास सांगितले.
महसूल सप्ताहाच्या शुभारंभाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयासमोरील मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले. महसूल कर्मचाऱ्यांनी दिवसभर कार्यालयाची स्वच्छता करणे, फायलींचे वर्गीकरण करणे, महसूल अभिलेख शाखा अद्यावत करणे अशा प्रकारची कामे केली. या महसूल सप्ताहाचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल अशा पद्धतीने सातही दिवसाचे नियोजन करून तशा पद्धतीने कार्यवाही चालू असल्याचे तहसीलदार डॉ किशोर देशमुख यांनी सांगितले.