रोहा – (प्रतिनिधी) रोहा तालुक्यातिल युवा पिढी, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांच्या आहारी गेलेला आहे. यागोष्टीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच वाममार्गाला लागलेल्या युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी रोहा प्रेस क्लब तर्फे शुक्रवार दि. ४ ऑग. ला सायंकाळी ५ वाजता रोहा येथील भाटे सार्वजनिक वाचनालय येथे सामाजिक संस्थां आणि राजकीय पक्षांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील तरुण पिढी, हातावर पोट असलेला कष्टकरी वर्ग झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांकडे वळलेला आहे. नोकरदार वर्ग रोजची कमाई घालवून कर्जबाजारी होत आहेत. पैसे कमावण्याचा सोपा मार्ग म्हणून वाममार्गाला लागल्याने अनेकांच्या आयुष्य उध्वस्त होत आहेत. वाममार्गाला लागल्याने तरुणाच्या आत्महत्या, मित्राची हत्या असे गंभीर गुन्हे यापूर्वी तालुक्यात घडलेले आहेत. सोशल मीडियावर खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त झाल्याने रोहयातिल पत्रकारांनी रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून हे अवैध धंदे रोखण्यासाठी रोहा पोलिसांना निवेदन दिले होते. या घटनेनंतर सदर विषयी समोर आलेलं वास्तव अतिशय भयानक आहे, भविष्यात रोहा तालुक्यात असे काही अघटीत व दुर्दैवी प्रसंग घडू नयेत, असंख्य कुटुंब, अनेकांचे संसार त्यामुळे उद्धवस्त होऊ नयेत, यासाठी प्रेस क्लबने रोहयातिल सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकत्रित बैठकीचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन केले असल्याचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे. यागोष्टीला पायबंद घालण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काही प्रयत्न, काही उपाययोजना करण्याची गरज आहे. या प्रयत्नांतून तालुक्यात जनजागृती झाल्यास, लोक चळवळ उभी राहिल्यास वाममार्गाला लागलेल्या युवा पिढीला योग्य दिशा मिळू शकेल. तसेच त्रस्त असलेल्या त्याच्या कुटूंबियांना या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.