रोहा (प्रतिनिधी) किल्ला धाटाव पंचक्रोशी विभागातील शेतकऱ्यांच्या सर्वांग हितासाठी, शेतीच्या प्रगतीसाठीच्या ध्येयाप्रती शुक्रवारी बळीराजा विकास फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. विविध शासकीय कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, शेतीसंबंधी उपक्रम, कृषी पर्यटन, योजनांबाबत जनजागृतीसाठी बळीराजा विकास फाउंडेशन संघटनेची स्थापना झाली. नव्याने स्थापन झालेल्या बळीराजा विकास फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कालवा समन्वय समितीचे प्रमुख विठ्ठल मोरे यांची सर्वांतूनमते बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी तुकाराम भगत, सागर भगत, सचिवपदी अॅड. दीपक भगत, खजिनदारपदी रुपेश साळवी, सहसचिवपदी महेश कांबळे यांसह सल्लागारपदी संदेश मोरे, राकेश बामुगडे, राजेंद्र जाधव, कृष्णा बामणे यांची निवड करण्यात आली. विभागातील बळीराजा हिताय, बळीराजा सुखाय ब्रीदवाक्यासाठी कायम प्रामाणिक प्रयत्न करणार, विभागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी कृतिशील भूमिका घेणार आहे अशी प्रतिक्रिया अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी निवडीनंतर दिली आहे . दरम्यान, विभागात शेतकऱ्यांच्या हितासाठी आता बळीराजा विकास फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवल्याने विभागातील सबंध शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर अध्यक्ष विठ्ठल मोरे व पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
तळाघर येथील बयोज ग्रीन फार्म येथे विभागातील शेतकरी, ग्रामस्थांची शुक्रवार ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीत प्रारंभी राजेंद्र जाधव यांनी लढा चालू असलेल्या कालव्याच्या कामाचा आढावा घेतला. संभे पाले हद्दीत लायनिंगची कामे, बारसोलीतील ड्रेनेज, तळाघर येथील ईस्कॅप नव्याने काम यांसह कालव्याला गेलेल्या खांडी याबाबत उपस्थित कालवा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. पाटबंधारे प्रशासनाने पोट कालवा मोकळे करावेत, जाणाऱ्या खांडीवर उपाययोजना कराव्यात. कालव्याचे सायपन व अन्य कामे निकृष्ट करणाऱ्या ठेकेदाराला पुढील कामे देऊ नयेत, असा ठराव बैठकीत पारीत करण्यात आला. बैठकीत शेतकरी संघटना स्थापन करण्याचे विचारविनिमय करण्यात आले. अखेर भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतीसंबंधी कालवा, विविध शासकीय योजनांवर काम करण्यासाठी बळीराजा विकास फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली गेली. संघटनेच्या अध्यक्षपदी विठ्ठल मोरे यांची निवड सर्वानुमते झाली. उपाध्यक्षपदी तुकाराम भगत, सागर भगत ,सचिवपदी दीपक भगत, सहसचिव महेश कांबळे, खजिनदारपदी रुपेश साळवी, प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार बामुगडे यांची अनुक्रमे निवड करण्यात आली. निवडीनंतर अध्यक्ष विठ्ठल मोरे व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. भागातील शेतकरी, शेतीसंबंधी कार्यासाठी आपण कायम तत्पर राहू अशी भावना अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली. भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी तळाघर येथे मध्यवर्ती ठिकाण बळीराजा विकास फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी अधिक माहिती सचिव ॲड. दीपक भगत यांनी दिली. दरम्यान, आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याला पाणी आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत असलेल्या कालवा समन्वय समितीने शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवून एक पाऊल अधिक पुढे टाकले, त्यामुळे भागातील शेतकरी पुढील वर्षातील कालव्याचे पाणी, शेतीसंबंधी विविध उपक्रम, योजनांनी अधिक सुखावतील असा विश्वास आता व्यक्त झाला आहे.