रोह्याला पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘वाणवा’, शेतकऱ्यांत नाराजी, दुसरा सक्षम अधिकारी बदलून देतो; डॉ श्याम कदम यांचे ठोस आश्वासन

Share Now

228 Views

रोहा (प्रतिनिधी) तालुक्याचा ठिकाण असलेल्या रोह्यासाठी तब्बल एकदीड वर्षे पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकारीच नाहीत, अधिकाऱ्यांची वाणवा असल्याचे भयान चित्र आहे. सध्यास्थितीत नियुक्त असलेले अतिरिक्त पशु वैद्यकीय अधिकारी अक्षय सांगळे हे कार्यालयीन दवाखान्यात फार उपस्थित नसतात, ठरवून दिलेल्या वारात लोकांना मिळतच नाहीत. त्यामुळे रोहा शहर व आजूबाजूची गावे, दुर्गम भागातील पशूधन यांसह सर्वच प्राण्यांवर वेळेत उपचार होत नाहीत, याबाबत अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यात, गुरंढोरं, बकऱ्या, कोंबड्या यांसह सर्वच पाळीव प्राण्यांवर योग्य व वेळेत उपचार होत नाहीत अशाने पशुधन अक्षरशः धोक्यात येत आहे. याबाबत पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना गांभीर्य आहे की नाही ? अशी स्पष्ट नाराजी आता शेतकऱ्यांतून सुरू झाली आहे. दरम्यान, ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेता रोह्यासाठी दुसरा सक्षम अधिकारी तातडीने बदलून देतो असे ठोस आश्वासन जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ श्याम कदम यांनी दिल्याने पशुधन मालकांना मोठा दिलासा मिळाला तर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या बळीराजा विकास फाउंडेशनचे सदस्य ग्रामस्थ तुकाराम मोरे यांसह विकास फाउंडेशनच्या तक्रारींची जिल्हा पशु वैद्यकीय प्रशासनाने दखल घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोहा पंचायत समितीच्या पशु वैद्यकीय कार्यालयात मागील एकदीड वर्षे वैद्यकीय अधिकारी फारसे दिसत नाही. डॉ. अक्षय सांगळे यांची रोहा शहर व आजूबाजूंच्या गाव वाडीपाड्यातील पाळीव पशूच्या उपचारासाठी अतिरिक्त नियुक्ती आहे. सोमवार, शुक्रवार असे वार ठरविण्यात आले आहे. मात्र या दोन वारांत सर्वच ठिकाणच्या पशुंवर योग्य उपचार होत नाहीत. मुख्यतः प्राण्यांवर उपचार करणे शक्य नाही. अशात तालुका ठिकाणच्या रोह्याला पूर्ण वेळ पशु वैद्यकीय अधिकारी मिळावा ही मागील वर्षापासूनची मागणी आहे. पशु वैद्यकीय अधिकारी प्राण्यांच्या उपचारासाठी वेळेत न आल्याचा फटका संबंधीत पशुधन मालकांना वारंवार बसला. वेळेत उपचारा अभावी अनेक गुरे , बकऱ्या दगावल्याचा संताप शेतकऱ्यांनी केला. निवी येथील शेतकरी गणेश राऊत यांच्या गाईचा बळीही उशिरा उपचाराने घेतला. तरीही गाईची दखल जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ श्याम कदम यांच्या तातडीच्या आदेशाने डॉ अक्षय सांगळे व टीमने घेत उपचारार्थ शर्तीच्या प्रयत्नांतून किमान पाडसाला बचावण्यात यश आले. पण गाईचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. गुरे व बकऱ्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याने स्थिती अधिक गंभीर होते, त्यासाठी रोहा शहर, ग्रामीणसाठी स्वतंत्र पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी अनेकदा झाली. मूळात अतिरिक्त नियुक्त डॉ अक्षय सांगळे हे कार्यालय दवाखान्यात अनेकांना मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अधिक गैरसोय होते. त्यामुळे सक्षम पशु वैद्यकीय अधिकारी नियुक्त करा अशा मागणीला आता जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अक्षरशः हिरवा कंदील दिला. जिल्ह्यात तब्बल २० जागा पशुधन विकास अधिकायांच्या खाली आहेत. पशुधन पर्यवेक्षकाच्या तब्बल ४० जागा रिक्त आहेत. त्यामुळे ही गंभीर स्थिती आहे अशी वास्तवता सांगत रोहा शहर व ग्रामीणासाठी सक्षम पशु वैद्यकीय अधिकारी बदलून देतो असे आश्वासन जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ श्याम कदम यांनी दिले आहे. दरम्यान, बळीराजा विकास फाउंडेशनच्या शेतकऱ्यांच्या वतीने केलेल्या तक्रारीची दखल जिल्हा पशु वैद्यकीय प्रशासनाने घेतल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले तर सक्षम पशु वैद्यकीय अधिकारी तातडीने बदलून न दिल्यास प्रशासनाला भानावर आणू असा इशारा बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *