रोहा – (शशिकांत मोरे) रोहा तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे.एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून, तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरविण्याचे काम सुरू केलं आहे. गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याने खवय्यांची तोंड सुद्धा लालेलाल होऊन तोंडातून पिचकाऱ्या टाकीत रस्त्यावर अक्षरशः जणू रांगोळ्या काढून ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर या गुटख्याच्या विचित्र दुर्गंधीचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत असल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक भागात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत असताना, रोह्यामध्ये विशेषतः धाटाव, वरसे, कोलाड, खांब नाक्यावर मात्र कारवाई होताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात. यासाठी राज्य शासनाला दरवर्षी गुटख्यामुळे होणाऱ्या आजारांवरील उपचारासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागत आहेत. या पदार्थांचे सेवन करणार्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते. तरुण पिढी नागरिक यापासून होणार्या जीवघेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना सन २०१२ मध्ये गुटखा बंदीचा कायदा लागू करण्यात आला. या कायद्याद्वारे गुटखा उत्पादन, वाहतूक, विक्री आणि सेवनावर निर्बंध लादले गेले. या घटनेला आज नऊ वर्षे झाली; पण या कायद्याची आज जिल्ह्यात शून्य अंमलबजावणी आहे. जिल्हातील झाडून सगळ्या पानपट्ट्यांमध्ये अगदी राजरोसपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसते.
गुटखा बंदीपूर्वी गुटख्यातून राज्याला सुमारे अंदाजे १२ कोटी रुपयांचा महसूल कररूपाने मिळत होता; पण या महसुलावर सरकारने पाणी सोडले. जनतेच्या हितासाठी गुटखा बंदी लागू केली; पण या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गुटखा विक्री सुरूच आहे. महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्री वर बंदी आणली, मात्र ही बंदी कागदावरच असल्याचं दिसून येतं आहे. असाच गुटखा व्यवसाय रोहा तालुक्यात धाटाव, वरसे, कोलाड, खांब नाक्यावर जोरात सुरू आहे. गुटखा बंदीनंतर जिल्ह्यात अनेक गुटखा विक्रेत्यांवर कारवाया केल्याचे शासकीय आकवाडेवरून दिसते; पण या सगळ्या कारवाया जुजबी स्वरूपाच्या असल्याने कायद्याबद्दल धाक उरला नाही. पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन हे आर्थिक हितसंबंधामुळे दुर्लक्ष करीत आहेत की काय असाही प्रश्न समोर येत आहे.
गुटख्याच्या विचित्र दुर्गंधीचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत असल्याने आता या परिसरातील ग्रामपंचायत प्रशासनाने देखील ग्रामस्वच्छतेच्या दृष्टीने या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचेच आहे, अन्यथा या परिसरातील विचित्र दुर्गंधीमुळे विविध आजारांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागणार हे मात्र निश्चित.