रोहा : धक्कादायक, अघोरी कृत्याचा ग्रामस्थांनी केला पर्दाफाश, पैशाचा पाडणार होते पाऊस ?, रोहा रत्नागिरी जादूटोणा कनेक्शन समोर

Share Now

808 Views

रोहा (प्रतिनीधी) माणूस चंद्रावर गेला, सर्व ग्रहांच्या शोधात आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. तरीही देश, राज्यातील अनिष्ठ रुढी, अघोरी प्रथा मुख्यत: जादूटोणासारखी अंधश्रद्धा संपायचे नाव घेत नाही. उलट अशिक्षीत व्यक्तीसह उच्चशिक्षीत कुटुंबही अशा अघोरी प्रथेच्या बाहूपाशात अडकल्याचे अनेकदा समोर आले. धामणसई, वांगणी परिसरात काहीजण भगतगिरी, मूठमाती करीत असल्याचे चर्चेत असतानाच धामणसई गावाच्या हद्दीत शनिवारी अघोरी विद्यासारखा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने रोहा यांसह संबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बौद्धवाडी शेजारील स्मशानभूमी व लहान मुलांच्या शाळेत फुले, अबिर गुलाल, लिंबू, टाचणी असल्याचे प्रारंभी काही ग्रामस्थांना दिसून आले. त्यातच दोन अनोळखी व्यक्तींना काहीतरी अमानुष अघोरी विद्या, जादूटोणा करताना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडले आणि चांगलाच दम दिला. त्याच झटापटीत काहीजण पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, अघोरी जादूटोणा करणाऱ्यांत अनेकजण रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत, ते पैशाचा पाऊस पाडणार होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. त्याच अनुषंगाने पोलीस तपास करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले आहे, तर अघोरी विद्या, जादूटोणा गुन्ह्याखाली संबधीत आरोपींना रात्रौ उशिरा अटक करण्यात आल्याची माहितीही पोलीस प्रशासन दिली आहे.

जिल्हा मुख्यत: रोहा तालुक्याच्या काही ग्रामीण भागात आजही देवदेवस्की, अघोरी विद्या करण्याचा प्रकार चालत असल्याचे चर्चेत आहे. अघोरी विद्या करणाऱ्यांना अशिक्षीत सामान्य व्यक्ती एवढेच काय ? उच्चशिक्षीत सदन व्यक्तीही बळी पडत असल्याचे भयान वास्तव आहे. धामणसई परिसरात भगतगिरी चालत असल्याचे अनेक वर्षांपासून उघडपणे बोलले जाते. याबाबत उलटसुलट चर्चा असतानाच धामणसई हद्दीत शनिवारी धक्कादायक प्रकार सोमवार आला. रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ६ ईसम कोलाड विभागातील व्यक्तीसोबत धामणसईतील श्मशानभूमी व शाळेत अघोरी विद्या करत असल्याचा संशय काही ग्रामस्थांना आला. माऊली कृपा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विचित्र पूजाअर्चा करीत असल्याने हे संशयीत लोक ग्रामस्थांच्या कचाट्यात सापडले. त्यांना विचारणा केली असता सर्वजण अक्षरश: भांबाहून गेले. आता आपली सुटका नाही, असे दिसतात काहींनी धूम ठोकत पळ काढला. त्यातील चार आरोपींना ग्रामस्थ विजय जाधव व ग्रामस्थांनी रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले. अघोरी विद्या करणाऱ्यांतील म्होरक्या पळून गेला, असे ग्रामस्थ विजय जाधव यांनी सांगत कदाचित नरबळीसारखा भयानक प्रकार घडला असता, ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा अघोरी प्रकार उघडकीस आला, अशी भितीवजा प्रतिक्रिया ग्रामस्थ विजय जाधव यांनी दिली आहे.

पैशाचा पाऊस पाडणार होते ? अशी चर्चा आता तालुक्यासह संबंध जिल्ह्यात सुरू आहे. त्याचदृष्टीने रोहा पोलिसांनी तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले. अमानुष व अघोरी प्रथा जादूटोणा विद्याप्रकरणी आरोपी संतोष पालांडे वय ५० रा. रत्नागिरी, प्रदीप पवार वय ६० रा. रत्नागिरी, प्रवीण खांबल वय ४७ रा. रत्नागिरी, सचिन सावंतदेसाई वय ४९ रा. रत्नागिरी, दीपक कदम व ४१ रा. रत्नागिरी, मिलिंद साळवी व ५१ रा. रत्नागिरी, राजेंद्र तेलंगे वय ४२ रा. हेटवणे व इतर अनोळखी २ व्यक्तींविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व आघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करणे, समूळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधीत आरोपींना रात्रौ उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली. दरम्यान, रोहा तालुक्याच्या काही ग्रामीण भागात आजही भगतगिरी, अघोरी प्रथा अनेक वर्षे सुरू असल्याची चर्चा होती. अनेक अशिक्षीत सामान्य लोक अज्ञानातून तर उच्चशिक्षीत लोक पापभिरू वृत्तीतून बळी पडले असल्याचे बोलले जाते. मात्र धामणसईतील ग्रामस्थ विजय जाधव व सुज्ञ ग्रामस्थांनी जादूटोणा डाव उधळून लावल्याने तालुका, जिल्ह्यातील अनेक कुटुंब वाचतील अशी भावना व्यक्त होत ग्रामस्थांचे कौतुक झाले आहे तर अघोरी विद्या जादूटोणाचे रोहा ते रत्नागिरी नेमके काय कनेक्शन आहेत, याचा शोध घेत म्होरक्यांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *