धुतुम बेलोंडा खाडीवरील तसेच दिघोडे उघडीवरील साकव आले मोडकळीस, जुन्या साकवच्या जागी नवे रुंद पूल बांधण्याचे जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांची प्रशासनाकडे मागणी

Share Now

77 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील धुतुम गावाजवळ असलेले धुतुम बैलोंडा खाडीवर (नांदोरा )बांधलेला जुना साकव(पायवाट )तसेच दिघोडे उघडीवरील साकव नादुरुस्त होऊन मोडकळीस आलेले असून सिडकोच्या माध्यमातून जुन्या साकवच्या जागी नवीन पूल बांधण्यात यावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती उरण,सिडको प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली होती. सदर पूल जूने झाले आहे शिवाय रहदारीच्या दृष्टीने हे साकव निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच सदर साकव अरुंद असल्याने एकाच वेळी दोन्ही बाजूच्या वाहनांना एकाच वेळी प्रवास करताना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. जूना साकव असल्यामुळे ट्रॅफिकची सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे.दिघोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने धुतुम गावातील लोकांना दोघोडे येथे जाण्यासाठी सुलभ रस्ता तयार होईल. किंवा दिघोडे येथील नागरिकांना धुतुम येथे सुलभपणे जाता येईल. शिवाय धुतुम गावात आयओटीएल ही ज्वलनशील पदार्थची कंपनी कार्यरत आहे. येथे भविष्यात एखादी आग लागली तर फायर ब्रिगेडच्या वाहनांना किंवा ऍम्ब्युलन्स आदी वाहनांना येण्या जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. त्यामुळे भविष्यात खूप मोठा धोका निर्माण झाल्यास सुसज्ज असे नवीन पूल, नवीन रस्ते असणे गरजेचे आहेत.त्यामूळे जनतेचे हित लक्षात घेउन नागरिकांचा प्रवास सोप्पा व्हावा, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी जूना साकव (पूल) पाडून त्या जागी नविन पूल बांधावे अशी मागणी केली आहे.वैजनाथ ठाकूर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सिडको प्रशासनातर्फे पत्रव्यवहार करून वैजनाथ ठाकूर यांना कळविण्यात आले आहे की धुतूम-बेलोंडा खाडीवर (नांदोरा) बांधलेला जुना साकव नादुरुस्त होऊन मोडकळीस आलेला असुन सिडकोच्या माध्यमातून जुन्या साकवच्या जागी नवीन पुल बांधण्याबाबतचे आपल्यातर्फे निवेदन प्राप्त झाले आहे.सदरील साकवची जागा ही किनारपट्टी नियमन क्षेत्रामध्ये (CRZ) येते किंवा नाही याबाबत नियोजन विभाग, सिडकोकडून स्पष्टीकरण मागविण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक २ नुसार आपल्याला पत्राद्वारे कळविण्यात आले होते.सिडकोच्या नियोजन विभागाकडून प्राप्त स्पष्टीकरणानुसार सदरील साकवची जागा ही कांदळवन क्षेत्र व किनारपट्टी राखीव- १A (CRZ-१A), ५० मीटर बफर क्षेत्रामध्ये येत असून भारत सरकारच्या दिनांक १८ जानेवारी २०१९ च्या अधिसुचेनुसार सदर क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे नविन बांधकाम व विकास कार्य करण्याची परवानगी नसल्यामुळे सद्यस्थितीत सदर नवीन पुल बांधण्याचे काम करता येऊ शकत नाही.असे सिडकोने वैजनाथ ठाकूर यांना कळविले आहे.मात्र धुतुम बैलोंडा खाडीवर तसेच दिघोडे उघडी येथे त्वरित नवीन पूल बांधण्यात यावे. हा पूल अरुंद असावा यासाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर हे प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी खासदार तथा मंत्री सुनील तटकरे यांची देखील भेट घेतली आहे. लवकरच सदर समस्या मार्गी लावण्याचे तसेच या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर यांना दिले आहे.या संदर्भात सिडको व इतर प्रशासना सोबत लवकरच मिटिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ही समस्या मार्गी लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.धुतुम बैलोंडा तसेच दिघोडे उघडी येथे नवीन पूल त्वरित उभारण्यात यावे अशी मागणी आता जनतेतूनही पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *