आता तांबडी लघु धरणाचा घाट, म्हसाडी धरणाचे काय झाले ? चणेरावासियांचा सवाल, म्हसाडी धरणावर खासदारांची चुप्पी ? विचारेंचा आरोप

Share Now

355 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा अलिबाग तालुका राजकीय संघर्षात आजगायत मागास राहिलेल्या चणेरा भागाच्या विकासाकडे अद्याप कोणाचेच लक्ष नाही. आधीचे पाटील विरुद्ध तटकरेंच्या राजकारणात चणेरा कायम मागास राहिला. आजही विद्यमान आमदार, खासदार चणेरा भागाच्या विकासासाठी ठोस प्रयत्न करताना दिसत नाहीत. रोजगार, शिक्षणाच्या सुविधा नसल्याने अनेक गावातील तरुणांना मुंबईचा आश्रय घ्यावा लागला हे वास्तव आहे. दुसरीकडे प्रस्तावीत म्हसाडी धरण घोषणांत गुंडाळल्याने कोणतेच प्रकल्प झाले नाहीत. प्रस्तावीत म्हसाडी धरणाचे नेमके काय झाले, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री सुनिल तटकरेंनी गाजावाजा करत भूमिपूजन केलेल्या म्हसाडी धरणाला मूहूर्त कधी, म्हसाडी धरण होणार आहे का ? यावर कधीच थेट न बोलणाऱ्या खा सुनिल तटकरेंनी आता तांबडी धरणाचा घाट घातल्याने म्हसाडी धारणाचे काय झाले, यावर खा तटकरेंनी बोलावे, असा संतप्त सवाल बुधवारी चणेरावासियांनी केला आहे. दरम्यान, महत्वकांक्षी म्हसाडी धरणावर खा सुनिल तटकरेंची नेहमीच चुप्पी का, यामागे नेमके गौडबंगाल काय ? असा आरोपवजा सवाल म्हसाडी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी पुन्हा केल्याने म्हसाडी धरणावर खासदार आतातरी बोलतात का ? हे पाहावे लागणार आहे तर पाटबंधारे प्रशासनाची म्हसाडी धरणाबाबत कोणतीच अधिसूचना नसताना भूमीपुजनाचा घाट का घालण्यात आला, याच नव्या चर्चेत तांबडी धरण तरी वेळेत मार्गी लागेल का ?अशी तुफान चर्चा सुरू झाली आहे.

अलिबाग, मुरुड, रोहा तालुका समावेशक चणेरा मागास भागात विविध प्रकल्प आणण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या. प्रकल्पाच्या नावाखाली जमीन संपादन घोटाळा करण्याचा महाप्रताप झाला. सर्व सहभागी पक्षाच्या नेत्यांचा डाव टाइम्सने उधळून लावला. घोटाळा उघडकीस आणून तत्कालीन मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांना निलंबीत करायला लावले. तत्कालीन प्रांताधिकारी भितीनेच बदली करून गेले हे अधोरेखीत आहे. सीडको प्रकल्प, पाठोपाठ नाणारस्थित रिफायनरी आणण्याची चर्चा झाली. बल्क पार्क प्रकल्प उभारणार असे जाहीर झाले. प्रत्यक्षात कोणतेच प्रकल्प उभे राहिले नाहीत, याला घरच्याच आमदार, खासदाररांची नड आहे, अशी चर्चा सुरू झाली. आधीच्या प्रास्तावीत म्हसाडी धरणाचे काय झाले ? असा सवाल वारंवार होत असतानाच मंगळवारी खा सुनिल तटकरे यांनी तांबडी लघु धरणाचे भूमिपूजन केले. पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी धरणाचा लाभ होईल असे सांगितल्याने आमच्या म्हसाडी धरणाचे काय झाले, खासदारांनी यावर बोलावे, चणेरावासियांना अजून किती दशके मागास ठेवणार ? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ भारत पाटील यांनी दूरध्वनीवरून दिली. म्हसाडी धरणाचे भूमिपूजन १३ ऑक्टो २०११ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांनी गाजतवाजत केले. एफए कंन्स्ट्रक्शनला काम देण्यात आले. एकदोन कोटी रुपये खर्ची पडले. मात्र धरणाच्या कामात एक दगडही चढला नाही. याउलट सबंधीत प्रशासनाची अधिसूचना नसताना भूमिपूजन करण्यात आले, हे समोर आल्याने हेच का ते मंत्री ? अशी फजितीवर चर्चा झाली. अखेर एफए कंन्स्ट्रक्शनचे खत्री कोर्टात गेले, असा इतिहास सांगत म्हसाडी धरणासाठी आम्ही आजही आग्रही लढत आहोत, म्हसाडी धरणावर खासदारांची चुप्पी का ? असा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी केला. दरम्यान, चणेरातील म्हसाडी धरणाकडे माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते, खा सुनिल तटकरे, ना आदिती तटकरे, अलिबागचे आ महेंद्र दळवी यांनी आजतरी लक्ष दिलेले नाही, त्यातच खा तटकरेंनी तांबडी धरणाचा घाट घातल्याने आमचा म्हसाडी धरण कधी होणार ? असा सवाल पुन्हा चणेरावासियांनी केला. यावर खा तटकरे आतातरी बोलतात का ? हे लवकरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *