उरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील पाणजे, करळ, येथील नऊ शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने १९८६ साली कवडीमोल भावाने संपादित केल्या या संपादित जमिनींचा योग्य मोबदला न मिळाल्याने पाणजे, करळ येथील एकूण नऊ शेतकऱ्यांनी सिडको भवनासमोर येत्या २६ जानेवारीला आत्मदहन करणार असल्याचे सांगून या घटनेस सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, उप व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे जबाबदार असल्याचे करळचे प्रकल्पग्रस्त शेतकरी सुभाष तांडेल यांनी सिडकोला लेखी निवेदनाद्वारे दिला असून त्याची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना दिले आहे.
उरण तालुक्यातील पाणजे, करळ येथील शेतकरी एकनाथ जोमा भोईर, शंकर केशव तांडेल, लक्ष्मण बाळकृष्ण घरत, पंढरीनाथ गोपीनाथ कडू, केशव रामकृष्ण कडू, सुभाष मोतीराम तांडेल, प्रकाश अनंत कडू या शेतकऱ्यांची जमिनी नवी मुंबई प्रकल्पाकरिता सिडकोने १९८६ साली कवडीमोल भावाने संपादित केल्या मात्र आपल्या जमिनींचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून गेली अनेक वर्षे हे शेतकरी सिडको कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, आपल्या जमिनी हे एकमेव उदरनिर्वहाचे साधन होते ते गेल्याने भूमिहीन होऊन उपजीविका करण्यात खूप अडचणी येत असून याला सर्व सिडकोचे अधिकारी संचालक जबाबदार असून २६ जानेवारी पर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तर सिडको भवनासमोर आत्मदहन करू असा इशारा या सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे .