उरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात मागील दोन आठवड्यापूर्वीच अज्ञात चोरटय़ांनी घरात दरोडा टाकून दागिने तसेच रोकड रुपये लंपास केले. सोबतच त्याच रात्री गावातील तीन ग्रामस्थांच्या घरी दरोडा टाकण्यात आला, ही घटना ताजी असतानाच त्याच रात्री बाजूलाच असणार्या चिरनेर गावात दुसरी चोरी झाल्याची घटना घडली. ही घटना होऊन दोन आठवडे होऊन सुध्दा पोलिस प्रशासनाला अजूनही अज्ञात चोरांविषयी कोणताही सुगावा लागलेला नाही. गावातील तीन सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चोरटय़ांच्या हालचाली कैद झाल्याचे दिसून आले आहे. चोरटे रात्री १२ ते ३ च्या सुमारास गावात येतात चोर्या करतात, त्यांना नेण्यासाठी सकाळी चारचाकी गाडी येते ही घटना देखील ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. रोज रात्री तीन ते चार चोर येत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे. चोर अत्यंत चपळ व हत्यार बंद, असल्याने त्यांना पकडणे अवघड झाले आहे. त्यातच गावातील ग्रामस्थांनी स्वसंरक्षणाकरिता डोळ्यात तेल घालून रात्र भर स्वतः च पहारा देण्यास चालू केले आहे. यामधे अधिक प्रमाणात तरुण वर्गाने सहभाग घेतला आहे परंतू रात्रभर जागून सकाळी कामासाठी देखील जावे लागते त्यामुळे नोकरी तसेच कामधंद्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे जिवावर बेतेल अशी कामगिरी गावातील तरुण करत आहेत. यातच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन कळंबुसरे ग्रामपंचायत मार्फत उरण पोलीस प्रशासनास रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी चोरट्यांना पकडण्यासाठी गावातील पोलीस गस्तीचे प्रमाण वाढविण्यात यावे सदर चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात पोलिस प्रशासनाने तुम्ही कायदा हातात घेऊ नका, चोरांना मारहाण करू नका, तसेच तुम्ही पहारा देऊ नका, जागरण करू नका, असा ग्रामस्थांना सल्ला दिला आहे.
कळंबुसरे ग्रामस्थांकडून चोरांच्या बंदोबस्तासाठी उरण पोलीस ठाण्यात निवेदन
83 Views