रोहा (प्रतिनीधी) ठाकरे गटाचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या १ आणि २ फेब्रुवारीच्या रायगड दौऱ्यात रोहा येथे गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी पहिलीच ऐतिहासिक जाहीर सभा होत आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, आरोप प्रत्यारोप यांसह आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सभा होत असल्याने रोहा शहर, तालुक्यातील शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या रोहा होम ग्राउंडवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पहिलीच सभा घेत आहेत. आतापर्यंत रायगडच्या राजकारणातील दमदार राजकारणी सुनिल तटकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी कधीही ठाकरे बाणा दाखविलेला नाही, नागरिक व शिवसैनिकांत कायम तटकरेंविरोधात मवाळ भूमिका दाखवून दिली. त्यातच मागील माणगाव येथील सभेनंतर युवाप्रमुख आ आदित्य ठाकरे हे सुनिल तटकरे यांच्या सुतारवाडी निवासस्थानी पाहुणाचाराला गेले होते अशा सर्वच घटनेनंतर आता पुन्हा नवे विरोधक सुनिल तटकरेंवर उद्धव ठाकरे कठोर भाष्य करतात का, तटकरेंचा समाचार घेतात का ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या धर्तीवर शिवसैनिकांत दमदार उत्साह संचारला आहे. खा सुनिल तटकरेंच्या नेतृत्वाखाली शहर व तालुक्याच्या विविध विकासकामांतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी सज्ज झालो आहोत, नगरपालिका शहर कामांतील भ्रष्टाचार आधीही समोर आणला, आताही तोच भ्रष्टाचार जनतेसमोर आणणार असा ईशारा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला, तर आयोजित शिवसेनेच्या सभेला ठाकरे गटाची तोफ आ भास्कर जाधव उपस्थित राहतात का, तटकरेंचे कायमचे वैरी माजी केंद्रीय मंत्री खा अनंत गीते काय पलटवार करतात ? याचीच सर्वांना उत्सूकता लागली आहे.
रोहा येथील उरुस मैदानावर गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होत आहे. ठाकरे यांच्या सभेबाबत तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर माहिती दिली. यावेळी परिषदेला शहर प्रमुख दीपक तेंडुलकर, महिला आघाडी प्रमुख निता हजारे, उपतालुकाप्रमुख महादेव साळवी, महिला आघाडी प्रमुख समीक्षा बामणे उपस्थित होते. रोहा शहरात उद्धव ठाकरे यांची पहिलीच सभा होत आहे. सभेला जवळपास १० हजार शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांसह अन्य दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती आहे. राज्यातील बदलते राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फुटीरता, राष्ट्रवादीतील भ्रष्टाचाऱ्यांचा भाजपाशी युती, सुनिल तटकरेंचे कारनामे, आगामी निवडणुकांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाष्य करणार असल्याचे संकेत शेडगे यांनी यावेळी दिले. खा सुनिल तटकरेंविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोह्यात कधीच सहभाग घेतली नाही, तटकरेंशी अप्रत्यक्ष जुळवून घेतले. आघाडी काळात तटकरेंशी राजकीय सूत जुळवून घेतले. तेच तटकरे आता भाजपा प्रणित युतीत असल्याने उद्धव ठाकरे आतातरी खा तटकरेंवर कडाडून टीका करतात का, माजी मंत्री अनंत गीते तसे माहितीपर कानमंत्र देतात का ? यावर सभेतच उद्धव ठाकरे बाणा चालवितील, चालू राजकारणावर कठोर भाष्य करतील असे शेडगे यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गुरुवारच्या सभेत शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला आहे. ठाकरे शिवसेनेवर आजही लोकांचा प्रेम आहे, पाठबळ आहे असे सांगत आम्ही रोहा नगरपालिकेतील नेत्यांच्या नेतृत्वाखालील विविध भ्रष्टाचार अधिक ताकदीने बाहेर काढत लोकांसमोर आणणार, भुयारी ड्रेनेज गटार योजना, भुयारी विज पुरवठा योजना यांसह अनेक गैरव्यवहार, भ्रष्टाचार उघड करणार आहोत, त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही कायम लढा देणार असा शेडगे यांनी सबकुछ तटकरेंना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यत: तटकरेंचे राजकीय हाडवैर माजी मंत्री अनंत गीते आगामी निवडणुकांच्या धर्तीवर रोहा येथील पहिल्याच सभेत काय राजकीय भाष्य करतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची रोहा येथे पहिली सभा राजकीय दृष्ट्या कितपत यशस्वी ठरते, दुफळी झालेल्या ठाकरे शिवसैनिकांत चैतन्य भरला जातो का ? हे पाहावे लागणार आहे तर आक्रमक नेते आ भास्कर जाधव उपस्थित राहतात का, माजी मंत्री अनंत गीते तटकरेंवर काय दांडपट्टा चालवितात ? हे अधोरेखीत होणार आहे.