रोहा : (रविंद्र कान्हेकर) शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगावचे प्रभारी मुख्याध्यापक मधुकर फसाळे यांना राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य नंदुशेठ म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे आश्रम शाळेचे माध्यमिक शिक्षक पी. बी. मिट्टेवाड यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे अधीक्षक प्रज्ञाशील पोहनकर, अधिक्षिका, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आश्रम शाळेत गेली अनेक वर्षे प्रभारी मुख्याध्यापक मधुकर फसाले कामकाज करीत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी क्रीडा क्षेत्रात क्रीडा शिक्षकांच्या साहाय्याने तीन वेळा रायगड जिल्ह्यात आदिवासी विभागात चॅम्पियन हा किताब पटकावला. शाळा स्वच्छ अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी संख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न, राज्यस्तरीय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा, शाळेची शिस्त, आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या आहारावर भर दिला, शाळेच्या भौतिक सुविधा वाढीसाठी प्रयत्न केल्याने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामुळे रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदिवासी विकास विभाग पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनीही मधुकर फसाळे यांना शुभेच्छा दिल्या.