रोहा (प्रतिनिधी) राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अखेर मार्गी लागला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भातील सर्व मागण्या राज्य सरकारने शनिवारी पहाटे मान्य केल्या. मध्यरात्री अध्यादेश काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना ऐतिहासिक विजय झाल्याचा जल्लोष राज्यासह रोह्यात दमदार साजरा झाला. एक मराठा लाख मराठा.. जरांगे पाटील आगे बढो.. अशा घोषणांनी संबंध रोहा दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी करत उपस्थित शेकडो मराठा बांधव, भगिनींनी आनंद व्यक्त केला. एकमेकांना पेढे भरवून दिवाळी साजरी केली. दरम्यान, आरक्षण संबंधी मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या, हा एक ऐतिहासिक विजय लवकरच विजयी रॅली काढून साजरा करणार अशी घोषणा रोहा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी केली तर आता कर्माने कुणबी मराठा असलेल्या कागदोपत्री कुणबी मराठा, त्यांचे सगेसोयरे असलेल्या कुटुंबांना न्याय मिळेल, हे जरांगे पाटीलांच्या लढ्याचे यश आहे, हे यातून अधोरेखीत झाले आहे.
मराठा समाजाच्या मागण्यातील महत्त्वाच्या मागण्या राज्य सरकारने शनिवार अखेर मान्य केल्या. तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. यातून मराठा समाजाला ऐतिहासिक यश आल्याचे समोर आले. मराठ्यांच्या आरक्षण मागण्या मान्य झाल्याचे घोषित होतात संबंध राज्यात एकच विजयोत्सव साजरा झाला. रोहा नगरपरिषद समोर शेकडो मराठा एकटवून अख्या रोहा शहर भगवामय केला. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, उपाध्यक्ष नितीन परब यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव भगिनी एकत्र जमून ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला. कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहिलो नाय, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणांनी रोहा अक्षरशः दणाणला. शहरात विजयाचे भगवे झेंडे फडकले. छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून हा जल्लोष साजरा केला. यावेळी नितीन परब यांनी प्रत्येक वेळी मराठा एकवटला, लढला आणि आता जिंकलाही, यापुढेही मराठे एक राहतील असे सांगत हजारोंच्या संख्येने आपल्या मराठा बांधवांना शिदोरी देणाऱ्या भगिनींचे आभार परब यांनी व्यक्त केले तर लवकरच विजयी रॅली काढली जाईल अशी घोषणा अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी केली. दरम्यान, ऐतिहासिक विजयाचा जल्लोष व अखंड रोहा शहर भगवामय झाल्याने मराठा दमदारपणे एकवटाला असेच दृश्य पाहायला मिळाले तर मराठ्यांच्या विजय रॅलीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.