रोहा (प्रतिनिधी) धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांत अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रोजचे जल वायू प्रदूषण यांसह घातक रसायन नदी, इतरत्र टाकण्याचे गंभीर प्रकरण राजरोस समोर येत आहे. त्यातूनच नेहमीच खाते धोरणात आघाडीवर असलेले एमपीसीबी प्रशासन अधिकाऱ्यांची रोहयो अविरत चालू आहे हे वास्तव असतानाच खत निर्मितीतील ट्रान्सवर्ड कंपनीत शुक्रवारी झालेल्या अपघातात तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली. या घटनेने कंपन्यातील कामगारांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली. कामगारांत भीतीचे वातावरण पसरले असून कामगारांची सुरक्षा राम भरोसे… यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. सेफ्टी बेल्टची दोरी तुटल्याने तरुण कामगार खाली पडला आणि त्याच दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले, या घटनेने कामगारांच्या सुरक्षेबाबत कंपनी प्रशासन किती बेफिकीर वागते हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ट्रान्सवर्ड कंपनीतील शेड दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. गेट समोरील शेडचे पत्रे बसवण्याचे काम सुरू असताना आंबेघर (नागोठणे) येथील संकेत संजय पाटील वय वर्ष २६ हा तरुण कामगार उंचीवरून खाली पडला. काँक्रीट रस्त्याचा मार लागल्याने गंभीर दुखापतीत संकेत पाटील याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. तरुण कामगाराच्या अपघाती मृत्यूच्या घटनेने कामगार अक्षरशः भयभीत झाले. तरुणाला तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. संबंधीत डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघात घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी सुरू केली. कामगाराच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याने हा अपघात घडला असे प्राथमिक समोर आले आहे तर कारखान्यांच्या सुरक्षतेसाठी कंपन्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यात हयगय होता कामा नयेत असा रोजचा परिपाठ स्थानिक प्रशासनाने केला आहे. दरम्यान, तरुण कामगार संकेत पाटील याच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, सर्वेच क्षेत्रातील लोकांनी शोक व्यक्त केला. आता पाटील याच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. तर कंपनी प्रशासनाने कामगारांच्या सुरक्षतेबाबत पूर्णतः खबरदारी घेतलेली दिसत नाही. त्याबाबत सखोल चौकशी करून कंपनी संबंधी प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी असे आता चोहोबाजूने बोलले जात आहे.