रोहा (प्रतिनिधी) रोहा पोलीस ठाणेचे माजी पोलीस निरीक्षक यांचे फेसबुक प्रोफाईलवरील मेसेंजरचा वापर करुन एका अज्ञात चोरटयाने चणेरा (रोहा) विभागातील खैरेखुर्द येथील एका गवंडी काम करणाऱ्याची ६१ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अशा फसवणूक करणाऱ्या संदेशांपासून सावध रहावे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, आरोपींनी चणेरा (रोहा) विभागातील खैरेखुर्द येथील फिर्यादी शाहनवाज युनूस मुकादम यांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या नावाने फेसबुक मेसेंजरवर मेसेज करून माझा मित्र संदिप कुमार यांची सी आर पी एफ पोलीस दलातुन बदली झाली असुन त्यांचेकडे असलेले फर्निचर कमी किंमतीत विकणार आहे अशा मजुकुराचे फेसबुक व व्हॉट्सॲपवर मेसेज केला होता. त्या मेसेजवर विश्वास ठेवून फिर्यादी शाहनवाज युनूस मुकादम
यांनी संदिप कुमार व संतोष कुमार यांचे सांगणेनुसार एकुन ६१,५००/-रू रोख रक्कम त्यांचे बँक खात्यावर पाठवली. त्या रक्कमेच्या मोबदल्यात फिर्यादी यास फर्निचर मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने रोहा पोलीस स्टेशनमध्ये संदिप कुमार व संतोष कुमार यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात १४०/२०२४, भा.द.वि.सं. कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस करत आहेत.