रोहा (प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा, मुरुड, माणगांव, तळा आयोजित जिल्ह्यातील साहित्यिक कवींची वर्षा सहल, प्रसिद्ध अष्टपैलू व्यक्तिमत्व, नाट्यकर्मी संजय गुंजाळ यांचा षष्ठीपूर्ती सोहळा, महाकवी कालिदास जयंती सोहळा चांगलाच रंगला. निवी येथिल दिपाली जाधव यांच्या निसर्गरम्य बयोज् ग्रीन फार्मवर रविवारी ७ जुलै रोजी अक्षरशः साहित्यिकांची पंढरी अवतरली. त्यात कवी वारकऱ्यांच्या मैफीलीने जबरदस्त रंगत आली. कवितांच्या बरसातीत रसिक ओलेचिंब झाले. मेघराजाने अधिकच रंग भरले. साहित्य, कवितांच्या मेजवानीने रविवार सोहळा सारेच स्मरणीय ठरल्याचे अधोरेखित झाले.
वर्षा सहल कार्यक्रमाचा प्रारंभ वृक्षारोपणाने करण्यात आला. मुरुड शाखेचे अध्यक्ष, नाट्यकर्मी संजय गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून उपस्थित साहित्यिकांनी निसर्ग संवर्धनाची शपथ घेतली. त्यानंतर दिपप्रज्वलन करून नाट्यकर्मी संजय गुंजाळ यांचा वाढदिवस विविध कृतीशील उपक्रमातून सादर करण्यात आला. गुंजाळ यांच्या जीवन कार्यावर कविता, मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी विचार पिठावर कोणसापचे जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, समन्वयक अ वि जंगम, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी, दुर्ग अभ्यास सुखद राणे अध्यक्ष संध्या दिवाकर, माणगांव शाखा अध्यक्ष अजित शेडगे, महाड शाखा अध्यक्ष गंगाधर साळवी, तळा शाखाध्यक्ष हेमंत बारटक्के, सचिव विजय दिवकर व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष संध्या दिवाकर यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. निसर्गरम्य ठिकाणी सर्व साहित्यिक एकत्र येणे, ही विचारांची मांदियाळी आहे. जणूकाही पंढरपूर अवतरले, सहभागी सर्व साहित्यिक वारकरी वाटावे असेच आहे असे सांगत दिवकर यांनी आनंदाचा सोहळा म्हणून वर्षा सहलीचा उल्लेख केला. अ वि जंगम यांनी संजय गुंजाळ यांच्या राजकीय, सामाजिक कार्याचा उल्लेख करत दिलदार माणूस म्हणून जंगम यांनी उल्लेख केला. जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी संजय गुंजाळ यांच्या विविध तिखट, गोड पैलूंचा उलगडा केला. कवी गंगाधर साळवी यांनी संजय गुंजाळ यांच्या कौतुकावर स्वरचित कविता सादर केली. यावेळी संजय गुंजाळ यांनी वाढदिवशी दिलेल्या प्रेमाची शब्दांतून उत्तराई केली. आपण पतीपत्नी तुम्हा साहित्यिकांच्या कृतीशीलतेने भारावून गेले आहोत. हा क्षण आयुष्यात कधीच विसरणार नाही. सर्वांचा कृतज्ञ आहे. असे सांगत वडील गुरुजन यांचा आवर्जून उल्लेख गुंजाळ यांनी केला.
आयोजित कविता सादरीकरण दुसऱ्या सत्रात अध्यक्षपद सुखद राणे यांनी भूषविले. प्रारंभी रविंद्र नामजोशी यांनी महाकवी कालिदास जयंती निमित्त मेघ मल्हार रागातून कालिदासांवर सुंदर गीत सादर केले. बाबाजी धोत्रे यांनी शंभर टक्के मतदान करा असा जागर केला. सिद्धी भगत हिने गौरवगीत सादर केला. सुचेता तटकरेंनी मैत्रिणीतून आपुलकीच्या नात्याचा संदेश दिला. शरद कदम यांनी ओलेचिंब पाऊस कवितेतून सादर केला. आशिष पाटील यांनी संजय गुंजाळ यांच्यावर कविता सादर केली. नेहल प्रधान आत्मविश्वास, मारुती कदम मित्रास, संदीप पाटील यांनी मला मारू नकोस ग आई भ्रूणहत्येवर कविता सादर केली. वैशाली साळुंखे यांनी व्यथा पुरुषांची, उषा खोत नातं , प्रणय इंगळे यांनी भोग, विजय देवकर यांनी पाऊस पाणी, चेतन बारटक्के यांनी प्रेस कविता, राजेंद्र जाधव यांनी हसत हसत खेळत जगा, सिद्धेश लखमदे यांनी म्हण ना, हेमंत बारटक्के यांनी आयुष्य, सध्या दिवकर यांनी गझल सादर करून रसिकांचे मने जिंकली. गायक राकेश कागडा यांनी यांनी सुरेल गीत गायले. सूत्रसंचालक हेमंत बारटक्के, कविता संमेलनाचे निवेदन भरत चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला उद्दोजक राम नाकती यांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संध्या दिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव विजय देवकर, शरद कदम, नेहल प्रधान, सुचेता तटकरे, चेतन बारटक्के, वैशाली साळुंखे, राजेश कागडा, राजेंद्र जाधव, कृष्णा गोमतांडेल, मारुती कदम, स्वराज दिवाकर यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी विशेष परिश्रम घेतले.