महाड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून महाडचे आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली महाड विधान शिवसेनेच्या वतीने महाड पोलादपूर व माणगांव तालुक्यात गेली चार महिने कोरोना महामारीच्या काळात प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या विविध शासकिय खात्यातील अधिकाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे महाड ग्रामिण रुग्णालय तसेच महाड पोलिस वसाहत येथील कोव्हीड केअर सेंटर मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
महाड पोलादपूर माणगांवचे आ. भरत गोगावले यांच्या शुभहस्ते महाड प्रांत कार्यालयात हा छोटेखानी गौरव सोहळा मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार चंद्रसेन पवार, नायब तहसिलदार कुडळ, घेमुड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोडांबे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव चिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे महाड तालुकाप्रमुख सुरेश महाडीक, राजिप सदस्य संजय कचरे, शहरप्रमुख नितीन पावले, शहर युवाअधिकारी सिध्देश पाटेकर, नपा विरोधी पक्षनेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे, निखिल शिंदे आदी उपस्थित होते.