रोहा (राजेंद्र जाधव) रास्त भाव धान्य दुकानामार्फत सामान्यांसाठी येणारे धान्य काळ्या बाजारात विक्री होणे नवे नाही. रेशनिंगचे धान्य परस्पर दुकानात गेल्याच्या घटना अनेक घडल्या, तसाच धक्कादायक प्रकार खांब हद्दीत घडल्याचे शुक्रवारी समोर आले. रेशनिंगची साखर चक्क किराणा दुकानात आढळून आली. कामगार शासनमान्य साखरेचे पॅकेट एका मोठ्या पिशवीत खाली करताना दिसत आहे. तसा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. रेशन पुरवठा दुकानदार बेधडकपणे रेशन काळ्या बाजारात विकत आला हे यातून अधिक स्पष्ट झाले. अशात रेशन दुकानदार यांच्यावर पुरवठा विभाग अधिकारी मुख्यत: तहसीलदार यांचे बिलकूल अंकुश नाही हे सुद्धा स्पष्ट झाले. त्यातून संबंधीत अधिकारी आणि रेशन दुकानदार यांचेच साटेलोटे नाही ना ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. रेशनिंगची साखर खुल्या बाजारात आणि आमचे तहसीलदार अशी व्हायरल झालेल्या पोस्टची खुद्द जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी गांभीर्याने दखल घेतली. दुसरीकडे संबंधीत संशयीत तक्रारदार यांच्या घरी काहींनी दमदाटी केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. एकंदर सर्वच प्रकारची दखल घेत प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या निर्देशाने शनिवारी पुरवठा विभागाचा पथक घटनास्थळी दाखल झाला. आता पुरवठा विभाग अधिकारी नेमकी काय चौकशी करतात, कोणावर काय कारवाई होते ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, रोह्याचे तहसीलदार यांचेच दुर्लक्ष झाल्याने हा गंभीर प्रकार घडला. त्यांचीच भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप करत संबंधीत दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेऊ अशी प्रतिक्रिया सर्वहरा जनआंदोलनाचे सोपान सुतार यांनी दिल्याने नेमके काय होते ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
रोहा तहसील प्रशासन कधी नव्हे ते प्रथमच चर्चेत आले. अधिकारी शासनाचा महसूल वसूल करण्यात कमालीचे व्यस्त झाले. तहसीलदार यांच्या धडक कारवाईने शासनाचा महसूल चांगलाच वाढला, असा दावाही करण्यात आला. प्रत्यक्षात काय काय घडत होते, हे लोक चर्चेतून समोर आले. कार्यक्षम असणारे तहसीलदार किशोर देशमुख यांच्या पुरवठा विभाग संबधीत शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. शासनाचा रास्त भाव दुकानातून साखरेचे शेकडो पॅकेट चक्क किराणा मालाच्या दुकानात गेले आणि तहसीलदारांची कार्यक्षमता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली. खांब हद्दीतील एका दुकानात कामगार रेशन मार्क असलेले साखरेचे पॅकेट मोठ्या बॅगेत खाली करत आहे. हा गंभीर प्रकार चित्रित झाला आणि एकच खळबळ उडाली. पुरवठा अधिकारी उज्वला अंधरे यांनी यासंबंधी पत्रकारांच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे प्रारंभी नेहमीप्रमाणे कानाडोळा केला. दुपारनंतर संबधीत किराणा दुकानदार यांनी व्हिडिओ केल्याच्या संशयाने एकाला दमदाटी केली. त्यानंतर हे प्रकरण अधिकच तापले. मग सोशल मीडियावर रेशनिंगची साखर खुल्या बाजारात आणि आमचे तहसीलदार शिर्षकाची सर्व वृत्तांत पोस्ट व्हायरल झाली. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सदर प्रकाराची चौकशी करण्याचे रोहा प्रशासनाला निर्देश दिले. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या निर्देशानुसार पुरवठा अधिकारी उज्वला अंधरे यांनी सदर प्रकाराची चौकशी करून संबधीत दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगत घटनास्थळी भेट दिली. आता काय चौकशी होते, संबधीतांवर नेमकी काय कारवाई होते ? हे समोर येणार आहे.
जिल्हाधिकारी रायगड यांनी रेशनिंगची साखर खुल्या बाजारात घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले, याला पुरवठा अधिकारी उज्वला अंधरे यांनी स्पष्ट दुजोरा दिला. व्हिडीओतील दुकानदारांची आधी चौकशी करू, कोणत्या रेशनिंग दुकानदाराने काळया बाजारात साखर परस्पर विकली, याचीही चौकशी करून संबधीत दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन अंधरे यांनी दिले तर तहसीलदार हेच तक्रारींची दखल घेत नाहीत, त्यातूनच असे गंभीर प्रकार घडतात. आता त्यांचीच भूमिका आम्हाला संशयास्पद वाटते. मूळात आताच्या तहसीलचा सर्वच कारभार सामान्यांसाठी त्रासदायक झाला आहे. विविध चर्चेने तहसील प्रशासनाची प्रतिष्ठा धोक्यात येत आहे. त्यामुळे रेशनिंग संबंधी गंभीर प्रकाराची दखल घेत चौकशीतून संबधीत दोषीँवर, दुकानदारावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलनात्मक पवित्र घेऊ असा आरोप वजा मागणी सर्वहरा जनआंदोलनाचे सोपान सुतार यांनी केली. दरम्यान, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी रेशनिंगसंबंधी घटनेच्या चौकशीचे निर्देश दिल्याने मतितार्थ खूप काही सांगून जातो, असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जाते तर रेशनिंगची साखर काळ्या बाजारात उघड प्रकाराची दखल जिल्हाधिकारी रायगड, ज्येष्ठ समाजसेविका उल्काताई महाजन यांनी घेतल्याने रोहा पुरवठा विभाग अंशतः पारदर्शक होईल अशी अपेक्षा व्यक्त झाली. आता चौकशीअंती नेमकी काय कारवाई होते ? हे अधोरेखीत होणार आहे.