रोहा (राजेंद्र जाधव) रायगड यांसह रोहा तालुक्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी बुधवारी झालेल्या धुवांधर पावसाने कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने रोहा नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. पुढील काही तास अतिवृष्टीचा प्रशासनाने इशारा देत बुधवारी तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहिर करण्यात आली. ग्रामीणमध्येही मुसळधार पावसाने कहर केला, नद्या, ओहोळ, नाल्याना पूर आला. दुसरीकडे नेहमीप्रमाणे व्यवस्थानाचा बोजा उडत असलेल्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील काही वस्तीला जंगल भागातून, कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा फटका बसला, गणेशनगर व इतर वस्तीला अधिक फटका बसण्याचा धोका व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आतातरी वरसे ग्रामपंचायत प्रशासन यशस्वी ठरतो का ? हे समोर येणार आहे. दरम्यान, बुधवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने पुराची भीती व्यक्त झाली तर नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण व शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. ओहळ व नाल्याना पूर आल्याने अनेक ठिकाणच्या लावणीची कामे ठप्प झाली. मंगळवारी रात्रौ वादळासह पावसाने दमदार बॅटिंग केल्याने ग्रामीणातील अनेकांनी चांगलाच धसका घेतला. बुधवारी सकाळी कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडली. अष्टमी जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पोलीस प्रशासनाने पुलावरून रहदारी बंद केली, तर कुंडलिकेचे पाणी वाढण्याच्या शक्यतेने दोन्ही तिरावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला. ग्रामीण शहरातील अनेक सकल भागात पाणी साचल्याचे समोर आले. कुंडलिकेच्या पाणी पातळीत वाढ होण्याच्या शक्यतेनेही प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. बुधवारच्या मुसळधार पावसाचा झटका वरसे ग्रामपंचायत हद्दीतील काही वस्ती, शेतीला मोठ्या प्रमाणात बसला. कालव्याचे पाणी भुवनेश्वर मार्गे दमखाडी सरळ दिशेला जाण्याचा मार्ग बंद केल्याने दररोज काळभैरव मंदिरासमोरील रस्त्यावरून पाणी वाहत आहे, अशात रस्त्याला खांड जाण्याची भितीही व्यक्त झाली. रस्त्यावरील रहदारीला धोका निर्माण झाला. कालव्याचे गाळ काढण्यात लाखो रुपये खर्ची पडले, पण यावेळीही खर्च कामी न आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचा चांगलाच फज्जा उडाल्याचे चर्चेतून समोर आले. जंगलातील ओहळ व कालव्याचे पाणी वस्तीत शिरू नयेत, शेतीची नुकसान होऊ नयेत यासाठी आता वरसे ग्रामपंचायत काय उपाययोजना करते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधात्रिपाट झाली, तर कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांनी सावध रहावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन संबधीत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.