रोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहर यांसह कोलाड, नागोठणे सर्वच ठिकाणचे मटका, क्लब, जुगार अवैध धंदे कायम बंद करावेत, यासाठी रोहा प्रेस क्लबने पुढाकार घेतला. अनेकदा तक्रारी व मागणी करूनही सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात मुख्यतः पोलीस यंत्रणा कायम अपयशी ठरली. याला अनेक कारणे असल्याचे स्पष्ट आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे आता बंद होतील असा विश्वास व्यक्त झाला. याचवेळी तालुका ग्रामीणासह शहरात हातभट्टी सर्रास विकली जाते, याकडे उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव असतानाच तरुणांना जायबंद करत संसार उदध्वस्त करणाऱ्या विषारी ताडीमाडीची विक्री अद्याप सुरूच आहे. याच विषारी ताडीमाडीने आतापर्यंत कित्येक संसार भिंगारले. याच विषारी ताडीमाडी विक्रेत्यांचा टाइम्सने वारंवार पर्दाफाश केला, त्यावर सबंधीत प्रशासनाने ताडीमाडी विक्री धारकांना नोटीस बजावली, लुटुपुटूची कारवाई दाखवली गेली, मात्र ताडीमाडी विक्रेते पुन्हा जैसे थे राहत असल्याचे बोलले जाते. याला उत्पादन शुल्क विभागच कारणीभूत आहे. यातून विषारी ताडीमाडी विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाचे अंकुश राहिले नाही, त्यामुळे बहुजन समाजातील तरुण, प्रौढ यांसह आदिवासी बांधवांना विषारी ताडीमाडीच्या मागे लावून देशोधडीला लावण्याचा विचार आहे का ? असा सवाल आता सामान्यांतून झाला आहे.
मटका, जुगार विविध प्रकारचे क्लब रोहा शहर, नागोठणे, कोलाडात बिनधास्त सुरू होते. जुगार सहजगत्या उपलब्ध असल्याने तरुण, सधन व्यक्तीही धंद्यांच्या आहारी गेले. चांगले नोकरदार, व्यवसायिक लोकांनाही भलतेच वेड लागले, त्यातून भयानक घटना घडल्या, अशात शहर व तालुक्यातील खुलेआम चालणारे अवैध धंदे बंद करावेत, आमच्या मुलांना असल्या जुगारातून दूर करावे अशी भावना सामान्यांनी व्यक्त केली. अखेर पत्रकारांनी पुढाकार घेत अवैध धंदे बंद करण्याचा विडा उचलला. त्याचा धसका अवैध धंदेवाल्यांनी घेतला आहे, त्यातच रोहा शहर, तालुक्यात गावठी हातभट्टी, शहराच्या ठिकाणातील रसायनमिश्रीत विषारी ताडीमाडी विक्रीनेही अक्षरशः हैदोस घातला आहे. काजूवाडी, अष्टमी काही मोक्याच्या ठिकाणी असणारे गावठी गुत्तेही रोहा पोलिसांना कधीच बंद करता आले नाही, यामागे नेमके गौडबंगाल काय ? हे त्यांनाच माहीत. हीच गंभीर बाब अखेर पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनाही सांगितली. अवैध धंदे, गावठी हातभट्टी विरोधात पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेतो ? याच घडामोडीत विषारी ताडीमाडीचा मुद्याही नव्याने उपस्थित झाला. अनेक ठिकाणच्या परवानाधारक ताडीमाडी केंद्रात विषारी ताडीमाडीची सर्रास विक्री होते हे नवे नाही. अनेक तरुणांचे पाय ताडीमाडी केंद्रात जातात. ताडीमाडीची शुद्धताच इतिहासजमा झाल्याने पिणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आले. खोलवर डोळे, निस्तेज त्वचा, फुगीर पोट हे ताडीमाडी पिण्याचे लक्षण लगेचच लक्षात येते. विषारी ताडीमाडीच्या व्यसनाने आतापर्यंत अनेकजण जायबंद झाले. एकचा तर मृत्यू झाल्याची घटना घडली. बहुजन, आदिवासी समाजातील तरुण प्रचंड आहारी गेलेत. विषारी ताडीमाडी विक्रीकडे उत्पादन शुल्क विभाग कधीच गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे सामान्य कुटुंबातील तरुणांना देशोधडीला लावण्याचे धोरण प्रशासन अधिकाऱ्यांनी ठरविले की काय ? असेच खेदाने बोलले जात आहे.
ताडीमाडी आरोग्यासाठी उत्तम पेय मानले जाते. जिल्ह्यात ताडीमाडीचे अनेक अधिकृत परवानाधारक दुकाने आहेत, मात्र जिल्ह्यात ताडीमाडीचे प्रत्यक्ष उत्पादन फारच कमी होत आहे. मग वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रसायनमिश्रित सफेद चूर्ण मिसळविले जाते. तब्बल एक लिटर शुद्ध ताडीमाडीची ५ लिटर भेसळ ताडीमाडी केली जाते, हे खुद्द एका शौकीनाने टाइम्स’ला सांगितले. याच प्रक्रियेतून पोटात अक्षरश: विष जाते. याबाबत अनेक तक्रारी उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आल्या. त्यानंतर विषारी ताडीमाडीचा पर्दाफाश करताच सबंधीत अधिकारी विषारी ताडीमाडी विक्रेत्यांवर लुटुपुटूची कारवाई करीत आले. आता शहर, तालुक्यातील जुगार, मटका, क्लब अवैध धंदे यांसह शहर, आजूबाजूला मिळणाऱ्या गावठी हातभट्टी पाठोपाठ विषारी ताडीमाडी तरुणांना उद्ध्वस्त करीत असल्याच्या तक्रारी माता भगिनींनी केल्या. सर्रास विकली जाणाऱ्या विषारी गावठी हातभट्टीवर रोक लावण्यात पोलीस प्रशासन कायम अपयशी ठरले. त्यांना पोलीस ठाण्याच्या हाकेवरील हातभट्टी अद्याप उद्ध्वस्त करता आलेली नाही. अष्टमी परिसरातही हातभट्टी विक्री पूर्वपार सुरू आहे, याच वास्तवात विकली जाणारी विषारी ताडीमाडी विक्रीवर उत्पादन शुल्क विभाग कधीच कारवाई करू शकलेला नाही, यामागील गौडबंगाल सर्वश्रुत आहे. आतातरी उत्पादन शुल्क विभाग परवानाधारक विषारी ताडीमाडी विक्री केंद्रांवर काय कारवाई करतो ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.