रोहा (प्रतिनिधी) साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अग्रेसर कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेची वर्षा सहल चणेरा विभागातील बिरवाडी गडावर रविवारी वेगळ्या अनुभूतीत अधोरेखित झाली. प्रारंभी गडपायथ्याशी असलेल्या भवानी मातेचे दर्शन घेतले. मंदिरातच गडकिल्ले अभ्यासक व इये देशीचे दुर्ग या पुस्तकाचे लेखक सुखद राणे यांच्या पुस्तकातील बिरवाडी किल्याचे वर्णननावरील उतारा स्वराज दिवकर याने वाचून दाखवला. नंतर छ शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेवून बिरवाडी किल्ला म्हणजेच भवानीगडाच्या चढाईला सुरुवात केली.
सोबत असलेले बिरवाडी गावचे रहिवासी प्राथमिक शिक्षक भरत मुंगळे यांनी वाट दाखवत सर्वांच्या पुढे राहिले. सोबत सुखद राणे यांचे माहितीवजा मार्गदर्शन आणि पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या “जय भवानी जय शिवराय” अशा घोषणांनी बिरवाडी किल्ल्याचा परिसर दुमदुमून गेला. त्यामुळे किल्ला पाहाताना वेगळीच धमाल आणि ऊर्जा आली.
१६५७ ते १६६१ या काळात परिसराच्या संरक्षणासाठी तसेच चौल रेवदंडा व अवचितगड रोहा या कुंडलिका नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या काळी नावाजलेल्या चणेरा बाजारपेठेच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बिरवाडी किल्ला बांधून घेतला. एकतर अधिक श्रावणातील दिवसमध्ये सोनेरी उन व रिमझिम पाऊस यांच्या जुगलबंदीत हिरव्यागार रानातील ही हिरवी गडचढाईची पायवाट तुडवत बिरवाडी गडाचे दर्शन घेतले.
तिथेच जवळ असलेल्या खांबेरे या छोट्याशा गावातील कोमसाप सदस्य गणेश भगत यांच्या लक्ष्मी अग्रो फार्म हाऊसवर दुपारचे भोजन घेवून तिथेच कोमसाप शाखेच्या अध्यक्षा संध्या दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणेश भगत हे कोकण आयडॉल हा पुरस्कार प्राप्त शेतकरी असल्याने त्यांचे कोमसाप रोहा शाखेच्या वतीने शाल व श्रीफळ देवून अभिनंदन केले. त्यानंतर कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. सदर सहल व कविसंमेलनासाठी शाखेचे सचिव विजय दिवकर यांनी उत्तम नियोजन केले. संध्या दिवकर, सुखद राणे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जेष्ठ पत्रकार दिलीप वडके, विजय दिवकर, कवी हणमंत शिंदे, गणेश भगत, नारायण पानवकर, शरद कदम,भरत चौधरी, नेहल प्रधान, स्वराज दिवकर, तसेच खांबेरे गावचे रहिवासी माजी पोलीस पाटील खेळू शिंदे, बाळाराम पडवळ, चंद्रकांत शिंदे यांनी सुद्धा या कविसंमेलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या संमेलनात हणमंत शिंदे यांची कातकरी भाषेतील कविता, संध्या दिवकर यांची आगरी कविता – शिमीटचे जंगलान, राजेंद्र जाधव यांची केली पुढाऱ्यानी देशावर सत्ता कवितांना विशेष दाद मिळाली. संध्या दिवकर व विजय दिवकर यांनी ठेक्यात सादर केलेली संध्या दिवकर यांची ‘आला पाऊस माझ्या अंगणात’ या कवितेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुखद राणे, दिलीप वडके, गणेश भगत व संध्या दिवकर यांनी मनोगत सांगितले व दिवसभराच्या या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली. आभार प्रदर्शन गणेश भगत यांनी केले.