धावीर रोड (वार्ताहर) रोह्यात सोमवार १ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी प्रभू श्री रामाच्या अक्षता कळस शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या
शोभायात्रेत हिंदू महिला भगिनींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अक्षता कलश यात्रेत जय श्रीराम जयघोषाने अख्खी रोहा नगरी दुमदुमली.
श्री राम मारुती चौक येथून या शोभायात्रेची मिरवणूकीची सुरुवात झाली. ही मिरवणूक मेहंदळे हायस्कूल , सागर डेअरी, रोहा नगरपरिषद मार्गक्रम करत पुन्हा श्री राम मारुती चौक कडे मार्गस्त झाली. यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या यांचे रोहा तालुका कार्यालयाचे उद्घाटन कार सेवकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीराम मंदिरामध्ये भव्यदिव्य आरती करण्यात आली. आयोध्यात श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर साकारत आहे. या मंदिरात
२२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. रोहा तालुक्यातील १६५ गावांमध्ये जाऊन अक्षता वाटण्याचे काम आजपासून सुरू करण्यात येणार असून हे अभियान १ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत राबविण्यात येईल असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. येणाऱ्या २२ जानेवारीला प्रत्येक गावातील हिंदू बांधवांनी एकत्र येत घरोघरी दिवे लावून भजन कीर्तन करून दिवाळी सारखा सण साजरा करण्याचे यावेळी आव्हान करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष संजीव कवितके, किसन घाग’, रोहा तालुका भाजपाचे अध्यक्ष अमित घाग, रोशन चाफेकर, विलास डाके, वैभव कुलकर्णी तसेच, माजी उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, मयूर दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर यांसह महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.