रोहा (शशिकांत मोरे) एकीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका प्रचंड वाढला असतानाच राज्यातील महायुती सरकारने माणगाव- लोणेरे येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा घेतला आहे. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी करण्यासाठी लोकांना आणता यावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणावर आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी एसटीने प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यातच या कार्यक्रमासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठे फेरे पडणार आहे. होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे कोरोना फैलावण्याचा मोठा धोका असल्याने शासन आपल्या दारी.. पण त्याचा डोक्याला तापच भारी असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
या कार्यक्रमासाठी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आले असून हा कार्यक्रम संपल्यानंतर पुढे वाहतुकीचा जांगडगुत्ता झाला आहे. ५ जानेवारी रोजी रात्री १२ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत गोवा बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना कशेडी ते खारपाड्यापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. महामार्गावरील जड-अवजड वाहनांची वाहतूक शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत मोर्बामार्गे माणगाव वळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
खोपोली, पाली फाटा ते वाकण महामार्गावरून गोव्याकडे जाणाऱ्या व मुंबईकडून येणाऱ्या अवजड वाहनांनाही वाहतूक बंदी करण्यात आली आहे. मुंबईकडून येणाऱ्या व खारपाडा- करोडीकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. सरकारच्या या उपक्रमाला लाभार्थ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसादच मिळाला नाही. या सर्वांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी बल्क मेसेज पाठवले जात होते, तसेच त्यांचे फोन नंबर काढून त्यांना फोनही केले गेले. परंतु बहुतांश संबंधित लाभार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शासकीय यंत्रणा अस्वस्थ झाली आहे, अपेक्षित गर्दीसाठी काय करायचे, असा प्रश्न आता यंत्रणेसमोर उभा राहिला होता. शासनाच्या इव्हेंटला गर्दी जमवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले गेल्याचे बोलले जात आहे, लाभार्थ्यांच्या गर्दीसाठी रोहा एमआयडीसीतील कारखानदारांकडून १२० बसेसचे नियोजन करण्यासाठी तसे पत्र कारखानदारांना पाठविण्यात आले होते.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन आज शुक्रवारी ५ जानेवारी रोजी लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमाला गर्दी जमवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रायगडचे प्रशासन कंबर कसून कामाला लागले आहे. गर्दी जमवण्यासाठी गावागावातील लोक आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे मोठ्या प्रमाणावर आरक्षण करण्यात आले आहे. सुमारे ७५ हजार लोकांची गर्दी जमवण्याचा घाट घालण्यात आला असून एसटीबरोबरच खासगी बसेस, कार, दुचाकी यांचा वापर करूनही लोकांना घेऊन या असे निरोप देण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वच आगारातून मोठ्या प्रमाणावर एसटीचे ॲडव्हान्स बुकिंग झाल्याने एसटी बसेसचा मोठा तुटवडा निर्माण होणार असून शुक्रवारी नोकरदार, विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.