रोहा (शशिकांत मोरे) मागील दोन महिन्यांपासून होत असलेली युनिकेम कंपनीची नाहक बदनामी, कंपनीला वेठीस धरीत स्वार्थी प्रवृत्तीचा होणारा फार्स, त्यानतंर गेटबंद आंदोलन या सर्वच बाजूंनी कंपनीच्या नावारूपाला बाधा आणण्याच्या प्रकाराने कंपनीचे अस्तित्व धोक्यात येईल याची भीती कामगार वर्गात निर्माण झाली होती. गेटबंद आंदोलनामुळे भयभीत झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनी चांगलाच धसका घेतला होता.याच भयावह वातावणामुळे युनिकेम कंपनीच्या गेटबंद आंदोलन रोखण्यात अक्षरशः कामगार वर्गानेही या विषयात उडी घेऊन दंड थोपटले. याठिकाणी बाह्य स्वार्थी प्रवृत्तीमुळे युनिकेम कंपनीचे गेटबंद आंदोलन करून आमच्या रोजी रोटीचा प्रश्न ऐरणीवर येणार असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही. अशा प्रवृत्तीला यापुढे जशास तसे उत्तर देऊन ही प्रवृत्ती आम्ही कायमची मोडीत काढण्यासाठी कटिबद्ध आहोत असा एकमुखी निर्धार कंपनीतील सर्वच कामगार वर्गाने संताप व्यक्त करीत केला.
रोह्यात युनिकेम कंपनीतील ठेकेदारी वरून चिघळलेल्या वादाने उग्र रूप घेऊन तो वाद गेटबंद आंदोलना पर्यंत जाऊन पोहचला होता. या आंदोलनाचा वाद चव्हाट्यावर न येता सामोपचाराने मिटवावा. यामधे कंपनीला वेठीस धरले जाऊ नये यासाठी प्रशासनही प्रयत्नशील होते. तर कामगार वर्गाकडूनही आंदोलनकर्त्याना तसे सहानुभूतीपूर्वक पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र गेटवर असलेली पोलीस यंत्रणा आणि तेथील संवेदनशील वातावरण लक्षात आल्याने कामगारांच्याही शांततेच्या भावनांचा बांध अखेर फुटला आणि आश्चर्यचकित करून सोडणाऱ्या या गेटबंद आंदोलनाला ठोशास ठोशाने उत्तर देण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना,कामगारवर्ग आक्रमकपणे चांगलेच सज्ज झाले होते. या आंदोलनाच्या विरोधात दंड थोपटून कामगार वर्गानेही त्याच पद्धतीने आंदोलन कर्त्याना रोखण्याची चांगलीच तयारी केली. गेटबंद करणे म्हणजे हे काय साधे काम समजताय काय?अशा आक्रमक रोषात चीड व्यक्त झाली.
दुपार दरम्यान आंदोलन मागे घेणार असल्याचे समजताच आंदोलन कर्त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र कंपनीत कामावर असलेले कायम, स्टाफ व कंत्राटी आणि बाहेर असलेले एकंदरीत ४०० ते ५०० कामगार एकत्र येऊन यापुढे अशा प्रवृत्ती उदयास येऊ नये यासाठी एका ठोस निर्णयावर पोहचले. आम्ही सुद्धा भूमिपुत्र म्हणूनच काम करीत आहोत, भूमिपुत्रांच्या पोटावर कुणी येत असेल आणि यापुढे कंपनीत अशा प्रवृत्तीमुळे कामगारांना भयभीत व्हावे लागत असेल, कामगार वर्गामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या रोजीरोटिचा प्रश्न ऐरणीवर येणार असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही, कदापि सहन करणार नाही. पुढील भविष्यासाठी आम्ही सर्व संघटित आहोत. आमचा प्रत्येक कामगार कंपनीच्या बरोबर राहील. कंपनीला वेठीस धरण्याचा एखादा प्रसंग हा आमच्यावरच आलेला प्रसंग समजूनच सामोरे जाऊ. आपल्या सर्वांचे नव्याने दिवस सुरू झाले आहेत, त्यामुळे आमच्या भवितव्याला बाधा निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला यापुढे चांगल्या प्रकारे ठेचून काढू असा सज्जड दम भारतीय कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष सतीश भगत यांनी दिला.
युनिकेम कंपनी तोट्यात असताना आता नव्याने नामवंत अशा इपका सारख्या कंपनीने घेऊन कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटला आहे. मात्र कुणी एखाद्याने स्वतःच्या स्वार्थासाठी स्थानिक भूमिपुत्रांच्या पोटाशी खेळणार असेल तर त्याला तर त्याची जागा दाखवून देणार असा आक्रमक इशारा आपल्या मार्गदर्शनात स्टाफ असोशिएनचे ॲड. हर्षद साळवी यांनी दिला. तर कंपनीच्या व्यवस्थापनाने हा विषय त्यांच्या परीने व्यवस्थित हाताळला आहे मात्र एका व्यक्तीसाठी जर याठिकाणी तालुका इथे येऊन वातावरण भयभीत करीत असतील तर आम्हा सर्वांची कुटुंब इथे येतील, आणि वेळ प्रसंगी याठिकाणी अशा प्रवृत्ती विरोधात हाणामारी करण्याची वेळ आली तरी आम्ही घाबरणार नाही आम्ही त्या ठिकाणी दोन हात करण्याची भूमिका घेऊन सामोरे जाऊ असे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी सचिन भगत यांनी सांगितले.
याठिकाणी कायम कामगार,स्टाफ कामगार व कंत्राटी कामगार अशा ५०० जणांनी एकजुटीचा विजय असो,हमसे जो टकरायेगा, वह मिट्टी मे मील जायेगा,हम सब एक है अशा जोरदार घोषणा दिल्या.