रोहा (महेंद्र मोरे) रोहा रेल्वे स्थानकावर आधीच कमी गाड्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये रोहा दिवा ही एकमेव गाडी रोहेकरांसाठी उपलब्ध आहे. मात्र या गाडीने प्रवास करतानाही रेल्वे स्थानकावर गेल्यावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रेल्वेच्या नियमांनुसार गाडी सुटण्याच्या एक तास आधीपासून प्रवाशांना तिकिट देण्यात येते. मात्र असे असतानाही येथील खिडकी हि कधीच वेळेवर उघडण्यात येत नाही. प्रवाश्यांची गर्दी वाढल्यानंतर आरडाओरडा झाल्यावर संबंधित बुकिंग क्लार्क खिडकी उघडून उपकार केल्याप्रमाणे तिकिटे देण्यास सुरुवात करतो. यामुळे प्रवाश्यांचा खोळंबा होत त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.एकूणच यासह अन्य सर्वच समस्या सोडविण्यासाठी नवनियुक्त सल्लागार समिती सदस्य लक्ष देतील का ? असा सवाल प्रवासी वर्गातून होत आहे.
रोहा रेल्वे स्थानक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा याचा प्रत्यय नेहमीच प्रवाशांना देत आला आहे.आधीच कर्तबगार लोकप्रतिनिधी मिळाल्या मुळे येथे थांबणाऱ्या गाड्यांची संख्या वाढण्या एवजी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामध्ये स्थानकातील एकमात्र रेल्वे ओव्हर ब्रिज, अपुरी व अस्वच्छ प्रसाधनगृहे, पावसाळ्यात गळके प्लॅटफॉर्म,चुकीच्या जागी असलेले वाहनतळ, अरुंद प्रवेशद्वार या समस्या जैसे थेच आहेत. याचा सामना करत हजारो रोहेकर रेल्वे सेवेचा वापर करत आहेत. मात्र प्रवासा करण्यासाठी लागणारे तिकीट मिळवण्यासाठी ही त्याला वारंवार विविध कारणांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. गर्दी व सणासुदीच्या दिवसांत दोन तिकीट खिडक्या मिळाव्यात ही रोहेकरांची कित्येक वर्षांपासून मागणी आहे. मात्र ती आजवर पूर्ण करण्यात आली नाही. यावर उपाय म्हणून प्रवासी अथवा एखाद्या व्यक्तिने रेल्वे चे कार्ड वर तिकीट काढण्याचे स्वयंचलीत तिकिट मशिन या ठिकाणी बसवण्यात आले आहे. याचा प्रवासी वर्गाला चांगला उपयोग होत आहे. मात्र सर्वच प्रवाश्यांकडे हे रेल्वे चे कार्ड नसणे अथवा तिकिटे देणारा खाजगी व्यक्ती उपलब्ध नसल्यास रेल्वे च्या अधिकृत तिकीट खिडकीवरच प्रवाशांना तिकीट घ्यावे लागते.मात्र अश्या वेळी रेल्वे स्थानकावरील खिडकी ही वेळेत उघडलेली नसते. रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी सुटणाऱ्या सव्वा पाच वाजताच्या गाडीच्या वेळी गाडी सुटण्याच्या पंधरा मिनिटे आधी झोपलेल्या बुकिंग क्लार्क ला प्रवाशांनी आरडाओरडा करून उठवल्यानंतर त्याने तिकिटे देण्यास सुरुवात केली. असे प्रसंग वेळोवेळी होतात असे प्रवासी वर्गाने संतप्त होत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नुकतीच रोहा शहरातील जेष्ठ भाजपा कार्यकर्ते वसंत शेलार, शहराध्यक्ष यज्ञेश भांड यांची रेल्वे स्थानक सल्लागार समिती वर नियुक्ती झाली आहे. त्यांनी आता रोहा स्थानकातील या सर्व समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.