रोहयात शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

Share Now

113 Views

रोहा (प्रतिनिधी) जर कायद्याचे बंधन नसते तर भाजपने लोकसभेच्या निवडणुका सुद्धा घेतल्या नसत्या, पराभवाच्या भितीने गेली दोन वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत, इतके घाणेरडे आणि निच राजकारण इतिहासात पहिल्यांदाच पहायला मिळाले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जनताच नेस्तनाबूत करणार आहे अशा शब्दात शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. गेली दोन वर्षे कुठेच नगरपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत. भाजपा सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे. त्यामुळे आपल्याला यापुढे प्राण झोपून काम करायचं आहे, गावागावात जाऊन जागृती करायची आहे, सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव साहेबांचे बळ वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपा सरकारला धडा शिकविण्यासाठी देशातील १० कोटी जनता वाट पाहत आहे. यावेळी जनता भाजपा व गद्दारांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी केंद्रीय मंत्री खा. अनंत गीते यांनी दिला आहे.

एकेकाळी आपल्या महाराष्ट्राची सभ्य व सुसंस्कृत राज्य म्हणून ओळख होती परंतू भाजपाने सत्तेच्या जोरावर आणि सत्तेच्या लालसेपोटी उत्तरप्रदेश आणि बिहार पेक्षा दयनिय अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली आहे अशा शब्दात गीते यांनी भाजपाचा समाचार घेतला. रोहा भाटे सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख समीर शेडगे, किशोर जैन, सुरेंद्र म्हात्रे, बळीराम घाग, चेतन पोटफोडे, महिला जिल्हा संघटीका डॉ स्विटी गिरासे, जिल्हा संपर्क संघटक ज्योत्स्ना दिघे, शहरप्रमुख दीपक तेंडूलकर, उपतालुका प्रमुख महादेव साळवी, तालुका संघटक निता हजारे आदी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी किशोर जैन, अनिल नवगणे, संजय कदम यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी लांढर गावातील राम महाडिक, नारायण चितळकर, कैलास माने, विशाल टेंबे, भावेश तांबे, अनिकेत शिंदे, प्रकाश धाडसे, गणेश जाधव, विठ्ठल भगत, यशवंत शिंदे, अंतोष शिंदे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश प्रवेश केला. या पक्ष प्रवेशा नंतर तालुक्यातील शिवसेना अधिक बळकट झाली आहे. तर स्थानिक पातळीवर अजित पवार गटाला धोक्याची घंटा वाजली असल्याचे बोलले जात आहे. आपल्या भागातील अनेक समस्या सोडविण्यासाठी या युवकांनी शिवबंधन बाधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *