उरण ( विठ्ठल ममताबादे ) बहुचर्चित शिवडी – न्हावा शेवा लिंकचे (महामार्गाचे )काम पूर्ण झाले असून या शिवडी न्हावा शेवा लिंक (अटल सेतू मार्ग)चे उदघाटन शुक्रवार दि १२ जानेवारी २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे २१ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या आणि २२ किलोमीटर लांबीच्या ‘शिवडी न्हावाशेवा अटल सेतू’ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.मात्र हे सेतू (मार्ग) मुंबई येथून सुरु होउन रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील चिर्ले गाव येथे संपणार आहे. चिर्ले ग्रामपंचायत हददीत या मार्गाचा समारोप होणार आहे. शिवडी न्हावा अटल सेतू हा प्रकल्प राबविताना एमएमआरडीए प्राधिकरणाने व महाराष्ट्र शासनाने चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे व नुकसानग्रस्त बाधितांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एमएमआरडीए व महाराष्ट्र शासनाने दिलेले वचन न पाळल्याने तसेच ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व चिर्ले ग्रामस्थांची मोठी फसवणूक केल्याने एमएमआरडीए अणि महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी विविध विकासकामे पूर्ण व्हावीत या मागणीसाठी ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांतर्फे शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचा जिथे मार्ग संपतो त्या चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मार्गालगत जन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र या संदर्भात चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सुधाकर पाटील व चिर्ले ग्रामस्थ यांची आणि कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, एमएमआरडीएच्या अधिकारी विद्या केणी, सिडकोचे अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकार, ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेचे ग्रामसेवक वैभव घरत यांची संयुक्त बैठक कोकण आयुक्त कार्यालय सिबिडी बेलापूर नवी मुंबई येथे पार पडली.या बैठकीत सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी चिर्ले गावातील विकासात्मक कामा संदर्भात सकारात्मक चर्चा केली. व एमएमआरडीएच्या अधिकारी विद्या केणी यांनी सर्व विकास कामे पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिल्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेचे सरपंच सुधाकर पाटील व चिर्ले ग्रामस्थांनी एकत्रित गाव बैठका घेउन १२ जानेवारी २०२४ रोजी होणारे एमएमआरडीएच्या विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी चर्चेत बोलताना सांगितले की चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत व चिर्ले ग्रामस्थांच्या मागण्या रास्त आहेत. जनतेला कोणत्याही समस्या उद्भवणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे सांगितले. यावेळी कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे सूचना एमएमआरडीए, सिडको, जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच त्वरित मिटिंग घेउन समस्या मार्गी लावण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक १६/१/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे या संदर्भात महत्वाच्या मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
जन आदोलन संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांतर्फे रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग, पोलिस आयुक्त कोकण भवन, पोलिस उपायुक्त परिवहन २, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा, तहसिलदार उरण, पोलीस स्टेशन उरण आदी ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले द्वारे पत्रव्यवहार करण्यात आला होता .मात्र आंदोलन संदर्भात व ग्रामस्थांची आश्वासन पूर्ण करण्या संदर्भात चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत, चिर्ले ग्रामस्थ व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यात कोकण आयुक्त बेलापूर नवी मुंबई येथे महत्वाच्या विषयावर मिटिंग संपन्न झाली.चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत चिर्ले बाकावली तलावाचे सुशोभिकरण करणे, मौजे गावठाण, चिर्ले जिल्हा परिषद रस्ता ते NH-4B हायवे पर्यंत आरसीसी नाला बांधणे, एम एम आर डी ए मधील प्रोजेक्ट मध्ये स्थानिकांची नोकरभरती करणे, चिर्ले बाकावली तलाव ते NH 4B हायवे पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. गावठाण स्मशान भूमी ते जाभूळपाडा बसस्टॉप पर्यंत काँक्रीटीकरण करणे,ग्रामपंचायत अंतर्गत गटारे व काँक्रीट रस्ते बनविणे आदी मागण्यांबाबत एमएमआरडीए, सिडको, जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने व लेखी आश्वासन मिळाल्याने सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे ग्रुप ग्रामपंचायतचे चिर्लेचे सरपंच सुधाकर पाटील यांनी सांगितले.