रोहा : ( प्रतिनिधी ) न्यायालयीन प्रक्रियेत उलटतपासणी हा आपल्या कामाचा एक महत्वाचा भाग आहे. उलटतपासणीत एखाद्या महत्वाच्या प्रश्नामुळे संपूर्ण खटल्याला कलाटणी मिळू शकते. त्यामुळे न्यायनिर्णय देतांना न्यायाधीश उलटतपासणी बघत असतात. त्यामुळेच उलटतपासणी ही एक महत्वाची प्रक्रिया असून उलटतपासातून वकील स्वत:ची ओळख निर्माण करतात असे प्रतिपादन रोहा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ आर. बी. सावंत यांनी केले. अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेकडून वकिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात “उलटतपासणी” या विषयावर निमंत्रित वक्ते म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी विधिज्ञ आर. बी. सावंत यांनी उलटतपासणीतील काँन्ट्रॅडिक्शन, अॅडमिशन व ओमिशन यांतील बारकावे सांगतांनाच काही महत्वाचे न्यायनिर्णय उपस्थित वकील वर्गसमोर सादर केले. तर प्रमुख दिवाणी न्यायाधीश सुनिल महाले यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित राहिल्या बद्दल कौतुक करुन भविष्यातही असे कार्यक्रम सुरु ठेवा त्यासाठी सहकार्य मिळेल असे बोलून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
रोहा वकील संघटनेच्या सहकार्याने रोहा न्यायालयातील वकील बार रुम मध्ये बुधवारी (दि.१७) सायंकाळी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रोहा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश सुनील महाले, सह न्यायाधीश मेघा हासगे, रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ आर.बी. सावंत, ज्येष्ठ विधिज्ञ एम.डी. पाटील, अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे अध्यक्ष धनंजय धारप, उपाध्यक्षा मिरा पाटील, उपाध्यक्ष समीर सानप, सचिव महेश घायले, कोषाध्यक्ष दिनेश वर्मा, कार्यालयीन सचिव देवयानी मोरे, कार्यालयीन सहसचिव दिव्या सावंत, सह कोषाध्यक्ष कविता जोशी अधिवक्ता परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य स्वराज मोरे, अधिवक्ता प्रवीण मुसळे, एम.के. शिंदे आदींसह अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे सदस्य यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अधिवक्ता मिरा पाटील यांनी केले. तर समारोप करतांना अध्यक्ष धनंजय धारप यांनी अधिवक्ता परिषद काय आहे व परिषदेचे कार्य कसे चालते याची संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता कुथे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दक्षिण रायगड मध्ये सर्वप्रथम कार्यक्रम राबविण्याचा मान अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेने मिळविला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.