रोहा (प्रतिनीधी) अकस्मित आजाराने असाह्य झालेल्या विक्रांत जंगम ह्या कामगाराला धाटाव एमआयडीसीतील प्रख्यात बेक केमिकल्स कंपनीच्या व्यवस्थापनाने वाऱ्यावर सोडल्याचे समोर आले. सदर कामगारावर आर्थिक चणचण भागवण्यासाठी अक्षरशः घर विकण्याची वेळ आली. यातूनच कंपनी व्यवस्थापनाचा कामावर न घेण्याचा निर्दयीपणा समोर आल्याने विक्रांत जंगम हा तरुण कामगार अन्यायाविरोधात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी रायगड कार्यालयसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, अकाली आलेल्या असाह्य आजाराने विक्रांत जंगम याचे कुटुंबच पूर्णतः कोलमडले. घरची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली, याची व्यवस्थापनाला माहीत असूनही कामावर घेण्यास नकार दिला, त्यामुळे चोहोबाजूनी संताप व्यक्त झाला तर कामगार विक्रांत जंगम याच्या अखेरच्या उपोषण हत्यारानंतर मुख्यतः कामगार आयुक्त प्रशासन आता नेमका काय निर्णय घेतो, कंपनी व्यवस्थापनावर सामुहिक दबावगट वाढतो का, कामगाराला न्याय मिळणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विक्रांत जंगम राहणार देवकान्हे हा बेक केमिकल्स कंपनीत अनेक वर्षे काम करीत आहे. कायम कामगार असलेला विक्रांत जंगम याला जून २०१८ साली कंपनीत अचानक चक्कर आली. आजाराच्या निदनानंतर ब्रेन ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले. उपचारार्थ आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ही शस्त्रक्रिया पूर्णतः सफल झाली नाही. पर्यायाने विक्रांत जंगम याचे मानसिक संतुलन बिघडले. अपंगत्व आले. नंतर कंपनीच्या सहकार्याने विक्रांत जंगम त्याच मानसिकतेत डिसेंबर २०१८ ला कंपनीत सेवेवर रुजू झाला. हालचालीकरिता स्टीकचा वापर करण्याची परवानगीही दिली. जून २०२१ पर्यंत तब्बल अडीच वर्षे कंपनीत प्रामाणिक सेवा दिली. अशातच कामगार विक्रांत जंगम याला आधीच्या अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे पुन्हा त्रास सुरू झाला. व्यवस्थापनाला कळवून जुलै २०२१ ला पुन्हा रजा घेतली. हायलँड हॉस्पिटल ठाणे येथे शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता आजाराचे त्रास न होता तब्येतीत सुधारणा होत आहे. तरीही स्टीकचा वापर याच कारणाने सबंधीत व्यवस्थापनाने कामावर घेण्यास नकार दिला. आधी त्याच स्थितीत कामावर घेतलेले व्यवस्थापन आता का नकार देतात ? हे आश्चर्य आहे.
विक्रम जंगम हा क्यूसी पदावर असिस्टंट मॅनेजर म्हणून रुजू आहे. बसूनच कार्यालयीन कामकाज आहे. स्टीक वापरण्याची तसे काहीच संबंध नाही. आधी त्याच अवस्थेत त्यांने जवळपास अडीच वर्षे काम केले. कामात कोणतीच दिरंगाई नाही. अपंगत्वामुळे पुढे काही समस्या निर्माण झाल्यास जबाबदारीही घ्यायला तयार आहे, असे असताना कामावर घ्यायला व्यवस्थापनाने अचानक नकार दिल्याने विक्रांत जंगम याने अखेर आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी रायगड यांसह कामगार आयुक्त प्रशासनाला दिले आहे. पत्राची दखल घेत गुरुवारी २५ जानेवारी रोजी कामगार विक्रांत जंगम याला चर्चेसाठी बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. आयुक्त प्रशासनाच्या चर्चेत नेमके काय घडते ? हे समोर येणार आहे. यावर कंपनीच्या वतीने व्यवस्थापक अतुल आठवले यांनी आम्ही विक्रांत जंगम याला कायमस्वरूपी तीनचार हजार रुपये मदत करू शकतो, पण कामावर घ्यायचा असेल काठीचा आधार नकोत, अशी अजब अटकळ आठवले यांनी घातल्याने किती हा निर्दयीपणा, इतरत्र कंपन्यांत अपंग कामगार नाहीत का ? असा संतप्त सवाल उपस्थित झाला. दरम्यान, न्यायासाठी असाह्य कामगार विक्रांत जंगम यांनी जिल्हाधिकारी रायगड कार्यालयासमोर उपोषणाचा ईशारा दिल्याने आतातरी कंपनी वठणीवर येते का ? हे पहावे लागणार आहे तर कामावर नसल्याने आर्थिक स्थिती पूर्णतः कोलमडली. त्यातून घर विकण्याचा निर्णय कामगाराने घेतल्याने चोहोबाजूने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली. यातून कामगाराला कितपत न्याय मिळेल ? असा सवाल उपस्थित झाला आहे.