रोहा (प्रतिनिधी) रोहा रंगीत फुलांचे शहर बनविण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या सिटी ऑफ फ्लाॅवर्स ग्रुपने कळसगिरीच्या हिरव्या गर्द कुशीत रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. कळसगिरी डोंगर रंगीत फुलांचे पर्यटन स्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. रोटरी क्लब ऑफ रोहा यांसह विविध गडदूर्ग, सेवाभावी, पत्रकार यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर दर रविवारी झाडांचे संगोपन करणे, जंगल सुरक्षा उपाययोजना, पाण्याच्या स्त्रोतचे जतन करण्यासाठी अविरत झटत आहेत. स्वतःसाठी आनंददायी जगता जगता निरोगी आरोग्याचा मंत्र अनेकांसाठी देत आलेत, त्यातून प्राचीन तलावाची उभारणी, रंगीत फुलांची लागवड करून पर्यटन स्थळासाठी झटणाऱ्या सिटी ऑफ फ्लाॅवर्स, रोटरी क्लबने रविवारी २८ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी कळसगिरीच्या कुशीत चित्रकला स्पर्धेचे भव्य खुले आयोजन केले आहे. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन व विद्यार्थ्यांना शाबासकी देण्यासाठी रोहा ईड़ असो.चे अध्यक्ष पी पी बारदेशकर, सुदर्शन कंपनीचे साईड हेड विवेक गर्ग, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय नारकर यांची उपस्थिती आहे अशी माहिती सिटी ऑफ फ्लाॅवर्स प्रमुख सुरेंद्र निंबाळकर यांनी दिली, तर कळसगिरीच्या कुशीतील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, निसर्गाच्या सानिध्यात रममान व्हावे असे आवाहन चित्रकला स्पर्धेचे प्रमुख उदय ओक, किरण बेंडखळे यांनी केले आहे.
कळसगिरीच्या कुशीत विद्यार्थी वेगवेगळी निसर्ग चित्रे काढून रंग भरणार आहेत. चित्रकला स्पर्धेत शहर, तालुक्यातील शाळांचे असंख्य विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. आजच्या शालेय विद्यार्थ्यांना निसर्गाची पर्यायाने दऱ्याखोऱ्या डोंगराच्या कुशीची आवड लागावी, निसर्गाची ओढ लागून डोंगराची, झाडांची जपणूक व्हावी, जंगल पूर्वीसारखे घनदाट, रम्य व्हावेत, हे चित्रकला स्पर्धेमागील प्रांजळ हेतू आहे. कळसगिरी सिटी ऑफ फ्लॉवर्स एक चळवळ व्हावी, चळवळीत अधिक लोक जोडले जावेत, कळसगिरी रंगीत फुलांचे पर्यटन व्हावे हाच प्रमुख उद्देश आहे, त्यामुळे चित्रकला स्पर्धेत सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन प्रोजेक्ट हेड सुरेंद्र निंबाळकर यांनी केले आहे. चित्रकला स्पर्धेत निसर्ग चित्र दिले जाणार आहे. लहान व मोठे विद्यार्थी अशा दोन गटात स्पर्धा होईल. सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांनी रंगकाम साहित्य, बसण्यासाठी मॅट स्वतः आणायचे आहे. ९८२२०८२८२०, ७७७४८५८२८९ या नंबरवर स्पर्धेसाठी नोंदणी करायची आहे. विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धा यशस्वीसाठी सिटी ऑफ फ्लॉवर्स संकल्पित सहभागी सर्व संघटना पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत. दरम्यान, कळसगिरी डोंगराच्या कुशीतील अनोख्या चित्रकला स्पर्धेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत, तर सिटी ऑफ फ्लॉवर्सने कळसगिरीच्या कुशीत शालेय विद्यार्थ्यांसाठी अनोखी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्याने विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.